अलमट्टीतून ‘औज’मध्ये पाणी घेण्याचा प्रयोग २०१५मध्ये फसला, तरी पुन्हा प्रस्ताव! पंढरपूर व सोलापूरला उजनीतून पाणी सोडण्यास मंजुरी

अलमट्टी धरणावरील कालव्यातून सध्या पाणी सोडायला सुरू आहे. उजनीत पाणी कमी असल्याने सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर शहरासाठी औज बंधाऱ्यात त्या कॅनॉलमधून पाणी घेण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला जात आहे.
sakal exclusive
sakal exclusiveSAKAL

सोलापूर : अलमट्टी धरणावरील कालव्यातून सध्या पाणी सोडायला सुरू आहे. उजनीत पाणी कमी असल्याने सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर शहरासाठी औज बंधाऱ्यात त्या कॅनॉलमधून पाणी घेण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला जात आहे. मंगळवारी (ता. १२) तो प्रस्ताव मंत्रालयात जाणार आहे, पण अलमट्टीच्या त्या कॅनॉलमधून पाणी सोडल्यावर ‘औज’ भरायला साधारणत: तीन ते चार महिने लागतील, अशी वस्तुस्थिती आहे.

पावसाळा संपत आला, तरीदेखील उजनीत उपयुक्त पाणीसाठा केवळ २० टक्क्यांपर्यंतच आहे. सध्या दुष्काळजन्य स्थिती असल्याने उजनीतील पाणी जपून वापरले जात आहे. पंढरपूर व सोलापूर शहरासाठी पाणी सोडल्यावर पुन्हा धरण मृतसाठ्यात जाईल, अशी सद्य:स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर औज बंधारा भरून घेण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याची विनंती महाराष्ट्र सरकार कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.

महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे-पाटलांनी त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करून मंत्रालयात पाठविण्याचे आदेश लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाला दिले आहेत. त्यादृष्टिने युद्धपातळीवर तयारी सुरु आहे. मात्र, २०१५मध्ये अलमट्टी धरणाजवळील कॅनॉलमधून ‘औज’मध्ये पाणी घेण्याचा प्रयोग झाला होता. त्यावेळी अतिशय कमी प्रमाणात पाणी येत होते म्हणून त्यानंतर तो प्रयोग झाला नाही. आता पुन्हा पाठविला जाणाऱ्या नव्या प्रस्तावातून काय साध्य होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

१२५ क्युसेक पाणी सोडल्यास औजमध्ये येते २५ क्युसेकने पाणी

अलमट्टी धरणावरील १६० किलोमीटरचा उजवा कालवा आहे. त्यात १२५ क्युसेक विसर्गाने पाणी सोडले जाते. तेथून पुढे १२ किलोमीटरपर्यंत छोटा नाला असून त्यातून औजमध्ये पाणी घेता येते. पण, सद्य:स्थितीत कॅनॉलची दुरवस्था झाली असून त्याठिकाणी झाडी-झुडपे वाढली आहेत. १२५ क्युसकने जरी पाणी त्यात सोडले, तरी औजमध्ये अवघे २५ क्युसेकपर्यंतच पाणी येते. या वेगाने पाणी आल्यास औज भरायला तब्बल तीन-चार महिने लागतात आणि तेवढे दिवस पाणी सुरू ठेवणे अशक्य मानले जात आहे.

पंढरपूर व सोलापूरसाठी पाणी सोडण्यास मंजुरी

पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनीत आता विसर्ग वाढणार आहे. सध्या काही भागात पाऊस पडत असल्याने सद्य:स्थितीत २० सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा पंढरपूर बंधाऱ्यात आहे. दुसरीकडे औजमध्येही ३० सप्टेंबरपर्यंत पुरेल एवढे पाणी आहे. दोन्ही शहरांची पाण्याची गरज पाहून उजनीतून पुढील १०-१२ दिवसांत पाणी सोडले जावू शकते. त्यासाठी पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. पण, पाऊस कमी झाल्यास शेती व उन्हाळ्यासाठी देखील पाणी लागणार असल्याने पाणी जपून वापरले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com