कृषी संस्कृती रक्षकांचा सण- नागपंचमी! सापाच्या ३३५ पैकी ७० प्रजातीच विषारी; नागपंचमीला जपले जाते माहेरपण; खेळ व झोक्यातून मिळते तणावमुक्ती

नागपंचमी हा कृषी संस्कृतीच्या उपासकांसाठी महत्त्वाचा सण आहे. नागपंचमी दिवशी स्त्रिया लाह्या व दूध वाहून वारुळाला पूजतात. लाह्या व दूध हे पदार्थ साप खात नसले तरी लाह्या खाण्यासाठी उंदीर बिळाजवळ येतात आणि सापांना आयते भक्ष्य मिळते. शेतमालाचे नुकसान करणाऱ्या उंदरांचा संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी पर्यावरण साखळीत नागाचे महत्त्व मोठे आहे.
नागपंचमी
नागपंचमीsakal
Updated on

सोलापूर : नागपंचमी हा कृषी संस्कृतीच्या उपासकांसाठी महत्त्वाचा सण आहे. नागपंचमी दिवशी स्त्रिया लाह्या व दूध वाहून वारुळाला पूजतात. लाह्या व दूध हे पदार्थ साप खात नसले तरी लाह्या खाण्यासाठी उंदीर बिळाजवळ येतात आणि सापांना आयते भक्ष्य मिळते. शेतमालाचे नुकसान करणाऱ्या उंदरांचा संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी पर्यावरण साखळीत नागाचे महत्त्व मोठे आहे.

नागपंचमी म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी नागाची पूजा केली जाते. फणा काढण्याच्या प्रवृत्तीमुळे नाग प्रसिद्ध आहे. नाग हा सर्पकुळातील असून तो फणा काढतो या वैशिष्ट्यामुळे नाग हा साप आदीमानवापासून सर्वांचे आकर्षण बनला आहे. कृषी संस्कृती नागाला देवत्व प्राप्त झाले आहे. निसर्गाच्या साखळीत सापांचे महत्त्व पूर्वजांनी ओळखून हे देवत्व दिले आहे. ज्याप्रमाणे शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या बैलांसाठी पोळा हा सण साजरा केला जाऊ लागला तसाच सापांचे महत्त्व पटवून देण्यासाठी नागपंचमी हा सण साजरा होऊ लागला.

सापांबद्दल अनेक गैरसमज

मानवी दृष्टिकोनातून पाहिल्यास सापाबाबत सकारात्मक व नकारात्मक या दोन्ही बाजू आहेत. पण त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष केले जाते आणि नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाते. नकारात्मक गोष्टी पसरविण्यात हिंदी चित्रपटांचा मोठा वाटा आहे. हिंदी चित्रपटातील ‘नागीन’, ‘नगिना’, ‘दूध का कर्ज’ अशा चित्रपटांनी सापांबद्दल अनेक गैरसमज निर्माण केले. चित्रपटांमुळे साप डूक धरतो. सापकडे ‘नागमणी’ असतो असे अनेक गैरसमज समाजात पसरले आहेत.

साप शत्रू नसून मित्र

भारतातील सापांना १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे. परंतु याची अंमलबजावणी होत नसल्याने सर्पहत्या अजूनही थांबलेल्या नाहीत. त्यामुळेच साप आपला शत्रू नसून मित्र आहे, हे जेव्हा प्रत्येकास कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने नागपंचमी साजरी होईल.

- राहुल शिंदे, सर्प अभ्यासक

---------------------------------------------------------------------------------

साप, वारूळ व त्यातील मुंग्या वाचवाव्यात

दरवर्षी लाखो उंदराकडून शेतीचे ३० टक्के उत्पन्न नष्ट केले जाते. अशा उंदरांना नियंत्रित करण्यात सापांचा खूप मोठा वाटा आहे. तर वारूळातील मुंग्या ज्या जमिनीवर वारूळ आहे तिथे जमिनीखाली दरवर्षी एक चौरस किलोमीटरवर ५० टन खत निर्मिती करतात. साप, वारूळ व वारूळात असलेल्या मुंग्या वाचविणे हे महत्त्वाचे आहे.

- संतोष धाकपाडे, सर्प अभ्यासक

मोजक्याच जाती विषारी

भारतात सापांच्या ३३५ प्रजाती आढळल्या असून त्यातील २२० प्रजाती बिनविषारी आहेत. ४५ निमविषारी असून फक्त ७० प्रजाती विषारी आहेत. त्यातही नाग, मण्यार, घोणस, फुरसे या ४ विषारी प्रजाती प्रामुख्याने महाराष्ट्रात सर्वत्र आढळत असून मानवास धोकादायक आहेत. पण योग्य (दवाखान्यात जाऊन) व वेळेवर उपचार झाल्यास माणूस वाचतो. निमविषारी व बिनविषारी सापांपासून मानवाच्या जीवितास धोका नसतो.

ठळक बाबी...

  • ग्रामीण भागात आजही वारूळ पूजनाची परंपरा

  • ज्वारीच्या लाह्या, दूध, पुरणाचा नैवेद्य वारूळाला अर्पण करण्याची प्रथा

  • नागासाठी वाहिलेले दूध, लाह्या, पुरणाचे नैवेद्य हे मुंग्यासाठी उपयुक्त

  • शास्त्रीयदृष्ट्या नागपंचमी सण हा जैवविविधता वाचाविण्यासाठीचा सण

  • वारुळे, साप, मुंग्या यांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने साजरी होते नागपंचमी

  • साप हा दूध पीत नाही किंवा कसलाही शाकाहार करत नाही

नागपंचमीला जपले जाते माहेरपण; खेळ अन् झोक्याने मिळते तणावमुक्ती

सोलापूर : विवाहाने अचानक संपलेले बालपण...सासरी नव्या नात्यांची जुळवून घेणे...वाढत्या जबाबदाऱ्यांनी पुरते अडकलेले दिनचक्र...या सारख्या तणावयुक्त जीवनात स्वतःला उभे करत असताना नागपंचमीचा मिळालेले माहेरपण, आनंदाचा झोका व बालमैत्रिणीसमवेत झिम्मा, फुगडी सारखे खेळ यातून मिळणारा आनंदाची ऊर्जा तीला बराच काळ पुरते. त्यामुळे नागपंचमीचा सण जगण्याची उभारी देणारा ठरतो. नागपंचमीला महिलांची माहेरी येण्याची परंपरा आहे. सासरच्या नात्याशी जुळवून घेताना सासरवाशिणीचा प्रामाणिक प्रयत्न असतो. पण माहेरी आले की रोजच्या जबाबदारीतून काही दिवसाची सुटका होते. मग आनंदाने ती माहेरी आलेल्या बालमैत्रिणींना साद घालते. परिसरात उंच झाडाला झोके बांधले जातात. मैत्रिणीसोबत झोका चढवताना खळाळणाऱ्या हास्याची ऊर्जा तीच्या मनावरील सर्व ताण संपवते. नंतरच्या झिम्मा व फुगडीसारखे अनेक खेळ तीच्या आनंदात भर घालतात. लेक माहेरी आली व सासरी ती सुखी आहे या भावनेने आईवडिलांचे व भावंडांचे मन तृप्त होते.

ठळक बाबी...

  • १) झिम्मा : सामुहीक खेळाने एकटेपणापासून मुक्ती

  • २) फुगडी : आपण एकटे नाही आहोत याची तीव्र जाणीव

  • ३) घागर फुंकणे व इतर खेळ : मूह जीवनाचा सराव

  • ) नाग पूजन : नागाला आपला भाऊ या नात्याने पूजन

तणावाच्या बंधनातून मुक्त होण्याच आनंद देणारा सण

मुळातच नागपंचमीचा सण हा प्रत्येक महिलेला रिलॅक्सेशन देणारी परंपरा आहे. महिलेने माहेरी यावे व मुक्तपणे बालमैत्रिणींशी संवाद व खेळ खेळणे आवश्यक आहे. झोकादेखील मनावरील ताण हलका करणारा खेळ आहे. तणावाच्या बंधनातून मुक्त होण्याचा आनंद या सणातून मिळवायला हवा.

- अलका काकडे, मानसोपचार तज्ञ, सोलापूर

------------------------------------------------------------------------------------

खेळातून आनंद मिळावा, माहेरपण जपता यावा म्हणून मंगळागौरी, नागपंचमी

स्त्रियांचे आयुष्य घड्याळाच्या काट्याबरोबर फिरणारे झाले आहे. नोकरी आणि घर या तारेवरची कसरतीमुळे आपली संस्कृती व परंपरा जपण्याची संधी मिळत नाही. पाश्चात्त्य सांस्कृतीचे अनुकरण करण्याचा नादात भारतीय संस्कृती लोप पावत आहे. त्यामुळे आपली संस्कृती परंपरा जपण्याच काम मंगळागौर व नागपंचमी या खेळातून आम्ही करत आहोत. मागील १३ वर्षात आम्ही महिलांना या सणाचा खरा आनंद देण्याचे काम करत आहोत. खेळातून आनंद मिळावा व माहेरपणा जपता यावा हे दोन्ही उद्देश मंगळागौरी व नागपंचमी या सणातून साध्य होतात.

- सरिता कुलकर्णी, नाच ग घुमा ग्रुप, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com