esakal | दहावी-बारावी निकालाची ठरली तारीख ! विद्यार्थ्यांची डिप्लोमा अन्‌ डी-फार्मसीला पसंती
sakal

बोलून बातमी शोधा

Exam Result

दहावी-बारावी निकालाची ठरली तारीख !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

राज्यात बेरोजगारी वाढल्याने विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाऐवजी रोजगारक्षम शिक्षणाला पसंती दिली आहे.

सोलापूर : राज्यात बेरोजगारी वाढल्याने विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाऐवजी रोजगारक्षम शिक्षणाला पसंती दिली आहे. दहावी-बारावीच्या गुणांची यंदा टक्केवारी वाढणार असल्याने आठ दिवसांत तब्बल 23 हजार विद्यार्थ्यांनी डिप्लोमा (Diploma) आणि डी-फार्मसीसाठी (D-Pharmacy) अर्ज केले आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेत 23 जुलैपर्यंत दहावीचा तर 2 ऑगस्टपूर्वी बारावीचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती पुणे बोर्डाच्या (Pune Board) विश्वसनीय सूत्रांनी दिली. (The result date of tenth and twelfth exams has been fixed)

हेही वाचा: 'MPSC'वर उपस्थितीची 'आपत्ती'! ऑगस्टमध्ये निकाल अन् मुलाखती

दहावी-बारावीतील साडेसोळा लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व प्रवेश प्रक्रियेला विलंब लागू नये, या हेतूने तंत्रशिक्षण संचालनालयाने (Directorate of Technical Education) विद्यार्थ्यांना परीक्षा क्रमांकाचा आधार घेत ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात डिप्लोमा इन इंजिनिअरिंगच्या (Diploma in Engineering) एक लाख पाच हजार तर पदविका औषध निर्माणशास्त्रच्या (डी- फार्मसी) 25 हजार जागा आहेत. गुणांची टक्केवारी अन्‌ व्यावसायिक अभ्यासक्रमाबद्दल पुरेशी माहिती नसल्याने अनेक विद्यार्थी विशेषतः ग्रामीण भागातील मुले दहावी- बारावीनंतर पारंपरिक शिक्षण घेतात. त्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ (Dr. Abhay Wagh) यांनी "स्कूल कनेक्‍ट' (Connect school) नावाचा उपक्रम राबविला. त्यामुळे राज्यातील चित्र बदलत असून आता तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.

हेही वाचा: लाचखोर पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस कोठडी! दोघेही सेवेतून निलंबित

सध्या राज्यात बेरोजगारी वाढली असून शासकीय नोकऱ्याही नाहीत. त्यामुळे पारंपरिक शिक्षणाला दूर करून पालकांच्या माध्यमातून विद्यार्थी डिप्लोमा, पदविका औषध निर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन (Hotel management), खाद्य व्यवस्थापन तंत्रज्ञान (food management technology) व सरफेस कोटिंग तंत्रज्ञान (surface coating technology) अशा अभ्यासक्रमांकडे वळले आहेत. निकालानंतर अर्जांची छाननी, कागदपत्रांची पडताळणी होईल. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात गुणवत्ता यादी जाहीर करून विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण केले जाणार आहे. 1 सप्टेंबरपासून अभ्यासक्रमाला सुरवात करण्याचे नियोजनही तंत्रशिक्षण संचालनालयाने केले आहे.

दहावी-बारावीचा निकाल 10 ऑगस्टपूर्वी जाहीर होणे अपेक्षित आहे. त्यानुसार डिप्लोमा, डी-फार्मसीसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे नियोजन झालेले आहे. यंदा निश्‍चितपणे विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाला पसंती दिली आहे.

- डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई

प्रवेश प्रक्रियेचे टप्पे...

डिप्लोमा इंजिनिअरिंग

  • ऑनलाईन अर्ज करणे : 23 जुलैपर्यंत

  • अर्जांची छाननी : 23 जुलै

  • तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध : 26 जुलै

  • अर्जांवरील तक्रारींचे निवारण : 27 ते 29 जुलै

  • अंतिम गुणवत्ता यादी : 31 जुलै

डी-फार्मसी (पदविका औषध निर्माणशास्त्र)

  • ऑनलाइन नोंदणी : 2 ऑगस्टपर्यंत

  • अर्जांची पडताळणी व छाननी : 2 ऑगस्ट

  • तात्पुरती गुणवत्ता यादी : 5 ऑगस्ट

  • तक्रार निवारण : 6 ते 8 ऑगस्ट

  • अंतिम गुणवत्ता यादी : 10 ऑगस्ट

loading image