esakal | दहावीचा निकाल लांबणीवर; आठवड्याभरानंतर लागण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

दहावीचा निकाल लांबणीवर; आठवड्याभरानंतर लागण्याची शक्यता

दहावीचा निकाल लांबणीवर; आठवड्याभरानंतर लागण्याची शक्यता

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई : दहावीच्या निकालपत्रासाठी भरण्यात आलेल्या माहितीत शाळा, मुख्याध्यापकांकडून मोठया प्रमाणात त्रुटी ठेवण्यात आल्याने राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीचा निकाल लांबणीवर पडला आहे. मंडळाकडून हा निकाल 15 जुलै रोजी पर्यंत जाहीर केला जाईल अशी घोषणा करण्यात आली होती परंतु ही डेडलाईन मंडळाला पूर्ण करता आली नाही, यामुळे आता हा निकाल आठवडाभरात जाहीर केला जाईल अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली. दहावीच्या निकालासाठी शाळा आणि शिक्षकांकडून संगणकीय प्रणालीत मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिल्याने दहावीचा निकाल हा लांबणीवर पडणार असल्याची बातमी 'सकाळ' मधून प्रसिद्ध करण्यात आली होती. ती बातमी खरी ठरली असून दहावीचा निकाल आता उशिराने लागणार आहे.

हेही वाचा: राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार? शरद पवारांनी केला मोठा खुलासा

कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता सरसकटपणे उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अंतर्गत गुण आणि त्यांच्या मूल्यमापन संदर्भात 10 जूनपासून शाळा स्तरावर कार्यवाहीला सुरुवात झाली होती. ही कार्यवाही ३ जुलै पर्यंत पूर्ण करून राज्य शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल 15 जुलै पर्यंत जाहीर केला जाणार होता. मात्र राज्य शिक्षण मंडळाकडून मूल्यमापन संदर्भात दिलेल्या कार्यपद्धतीत अनेक प्रकारच्या माहिती आणि त्याचे दस्तावेज गोळा करण्यासाठी नियमावली देण्यात आली होती, त्या नियमावलीत माहिती भरण्यासाठी शिक्षकांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रुटी ठेवण्यात आल्याने हा निकाल लांबणीवर पडला असल्याचे मंडळातील वरिष्ठ अधिकारी सूत्राकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: गणपती उत्सवासाठी कोकणात 2,200 एसटी बस सोडणार

राज्य शिक्षण मंडळाकडून निकालपत्रक तयार करण्यासाठी मंडळाच्या नऊ विभागीय मंडळात कामकाज आटोक्यात आले असल्याचा दावा केला जात आहे. मात्र अद्यापही मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आदी विभागीय शिक्षण मंडळातील कामकाज अद्यापही मोठ्या प्रमाणावर अर्धवट राहिलेले आहे. शिवाय शिक्षकांकडून भरण्यात आलेली माहिती आणि त्यानंतर मुख्याध्यापकांनी ऑनलाइन माहिती भरताताना अनेक प्रकारच्या त्रुटी, चुका ठेवल्या आहेत. त्यामुळे त्या दुरूस्त करण्यासाठी विभागीय मंडळांकडून शाळांतील मुख्याध्यापक शिक्षकांना विभागीय मंडळात प्रत्यक्ष बोलावून या त्रुटी दुरुस्त केल्या जात आहेत. त्यामुळेच मंडळाकडून देण्यात आलेल्या १५ जुलैच्या मुदतीत निकाल लावणे शक्य होणार नसल्यानेच हा निकाल लांबणीवर पडला आहे.

दहावीच्या निकालासाठी सर्वच कामकाज आटोक्यात आलेले आहे. काही थोडयाशा त्रुटी राहिलेल्या आहेत, त्या कुठेही राहू नये यासाठी त्या दुरूस्त करण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे आठवडाभरातच दहावीचा निकाल जाहीर केला जाईल.

- दिनकर पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

loading image