esakal | विमा कंपन्यांना दिले सव्वासहा हजार कोटी! पण, 70 लाख शेतकऱ्यांना छदामही नाही | Agricultural News
sakal

बोलून बातमी शोधा

पीक विमा योजना

29 सप्टेंबरला राज्य सरकारने विमा कंपन्यांना पीकविम्याचा 973 कोटींचा हिस्सा दिला.

विमा कंपन्यांना दिले सव्वासहा हजार कोटी! पण शेतकऱ्यांना छदामही नाही

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पावसाने ओढ दिल्याने जुलैमध्ये 40 लाख शेतकऱ्यांचे 27 लाख हेक्‍टरवरील पिकांचे तर ऑगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे 30 लाख शेतकऱ्यांचे अंदाजित 35 लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान (Crops Damage) झाले. खरीप 2021 मध्ये शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी (Crops Insurance) साडेचार हजार कोटींचा हप्ता भरला. 29 सप्टेंबरला राज्य सरकारने विमा कंपन्यांना पीकविम्याचा 973 कोटींचा हिस्सा दिला. मात्र, विमा कंपन्यांनी (Insurance Company) अजूनपर्यंत नुकसानीचा आर्थिक मुआवजा काढला नसल्याने बाधित शेतकऱ्यांना विम्याचा दमडाही मिळालेला नाही.

हेही वाचा: उजनी धरण शंभर टक्के भरले! भीमा नदीतून कधी सुटणार पाणी? जाणून घ्या

पेरणी झाल्यानंतर पावसाने ओढ दिल्यास शेती पिकांचे 75 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान झाल्यानंतर, शेतात पिके उभी असताना अतिवृष्टी, गारपीट, वादळ, महापूर आल्यानंतर त्यात शेती पिकांचे नुकसान झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी 72 तासांत विमा कंपन्यांना त्याची माहिती दिल्यानंतर आणि हंगाम बहरत असताना 15 ते 20 दिवसांपर्यंत पावसाने ओढ दिल्यास शेतकऱ्यांना पीकविमा कंपन्यांकडून भरपाई दिली जाते. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे सरासरीपेक्षा उत्पन्नात 50 टक्‍क्‍यांची घट झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेनुसार संबंधित महसूल मंडळातील 12 ठिकाणी पीक कापणीचे प्रयोग केले जातात. त्यावेळी नुकसानीच्या 25 टक्‍के रक्‍कम शेतकऱ्यांना दिली जाते. यंदा 23 जिल्ह्यांमधील 40 लाख शेतकऱ्यांचे 27 लाख हेक्‍टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, पीक काढल्यानंतर ते सुकविण्यासाठी 14 दिवस ठेवल्यानंतर अतिवृष्टीमुळे त्याचे नुकसान झाल्यास 72 तासांत त्याची माहिती विमा कंपनीला दिल्यानंतर त्याचे पंचनामे करून भरपाई देण्याची कार्यवाही केली जाते, असे निकष आहेत. परंतु, अजूनपर्यंत पूर्णपणे पंचनामे झाले नसून शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल, अशी माहिती कृषी विभागातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

कृषी विभागाच्या सांख्यिकी विभागानुसार...

  • जुलै ते 2 ऑक्‍टोबरपर्यंत नुकसान : 62.09 लाख हेक्‍टर

  • बाधित शेतकरी : 77.09 लाख

  • अंदाजित नुकसान : 44,500 कोटी

  • पीकविमा उरविलेले शेतकरी : 83 लाख

  • पीकविम्याची रक्‍कम : 4,500 कोटी

  • पीक विम्यातून मिळालेली रक्‍कम : 0000

हेही वाचा: Solapur : बार्शीत संशयित आरोपीकडून 24 लाखांचा मुद्देमाल जप्त!

केंद्राकडून विमा कंपन्यांना 900 कोटी

शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचा पीकविमा उतरविल्यानंतर विमा कंपन्यांना राज्य व केंद्र सरकारकडून उर्वरित हिस्सा वर्ग केला जातो. यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी राज्य सरकारने विमा कंपन्यांना 973 कोटी दिले असून केंद्र सरकारकडून आता 900 कोटी मिळणार आहेत. विमा कंपन्यांना शेतकऱ्यांचे साडेचार हजार कोटी, केंद्र व राज्य सरकारडील एक हजार 873 कोटी, असे एकूण सात हजार 373 कोटी रुपये मिळणार आहेत. आता निकषांवर बोट ठेवून विमा कंपनी शेतकऱ्यांना किती भरपाई देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

loading image
go to top