राज्य सरकारने पुन्हा बदलला निर्णय! श्री अन्न उत्कृष्टता केंद्र आता सोलापुरातच होणार; लोकसभा निवडणुकीपूर्वी नाराजी टाळण्याचा प्रयत्न

२४ नोव्हेंबरला नवीन शासन आदेश झाला आणि हे केंद्र बारामतीला स्थापन करण्याचा निर्णय झाला. आता हा निर्णय पुन्हा बदलून श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापूरमध्येच स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी (ता. १३) सरकारने घेतला आहे.
mantralay
mantralaysakal

सोलापूर : आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरा करताना १७ एप्रिल २०२३च्या शासन निर्णयानुसार सोलापूरसाठी श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा आदेश निघाला. पण, साडेसहा- सात महिन्यांनी २४ नोव्हेंबरला नवीन शासन आदेश झाला आणि हे केंद्र बारामतीला स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्यावेळी सोलापूरच्या वाट्याचे केंद्र बारामतीला पळविल्यावरून शेतकऱ्यांसह सर्वांनीच तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता हा निर्णय पुन्हा बदलून श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापूरमध्येच स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी (ता. १३) सरकारने घेतला आहे.

सोलापूर जिल्ह्यात ज्वारीसह तृणधान्याखालील क्षेत्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. रब्बीचा जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख असल्यानेच ते केंद्र सोलापूरसाठी मंजूर झाले होते. पण, पुणे जिल्ह्यात अत्यल्प क्षेत्र असतानाही हे केंद्र बारामतीला स्थापन करण्याचा नवीन निर्णय निघाला. त्यानंतर विरोधकांसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या नेत्यांवर, मंत्री, लोकप्रतिनिधींबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्याअनुषंगाने तसेच केंद्र सुरू करण्यास जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्याची ग्वाही देत नाराजीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण, ना निर्णय बदलला ना नियोजन समितीतून निधी मिळाला. हे केंद्र हलविल्यामुळे शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका निवडणुकीत बसू शकतो, विरोधक त्याचे भांडवल करतील याची धास्ती सत्ताधाऱ्यांना होतीच. या पार्श्वभूमीवर बारामतीला हलविलेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच होईल, असा नवीन आदेश शासनाला काढावा लागला अशी चर्चा आहे.

सोलापूरकरांच्या भावना जाणून सरकारचा चांगला निर्णय

सोलापूरचे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला नेण्याचा निर्णय झाला, पण ते पुन्हा आपल्याकडेच व्हावे यासाठी सतत पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून आता हे केंद्र सोलापुरातच होणार आहे. सोलापूरकरांसाठी हा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांसह सर्वांचेच अभिनंदन. आता केंद्रासाठी लवकरच जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

- सुभाष देशमुख, आमदार

नवीन शासन आदेशानुसार...

१७ एप्रिल २०२३च्या शासन आदेशानुसार श्री अन्न अभियानाअंतर्गत ‘श्री अन्न उत्कृष्टता केंद्र’ सोलापुरातच स्थापन होईल व तेव्हाच्या आदेशानुसार कार्यवाही होईल, असे १३ मार्च रोजी काढलेल्या शासन आदेशात नमूद आहे. तसेच २४ नोव्हेंबर २०२३ रोजी काढलेला आदेश अधिक्रमित (रद्द) करण्यात येत आहे, असेही त्यात स्पष्ट म्हटले आहे.

‘सकाळ’चा यशस्वी पाठपुरावा

सोलापूरमध्ये गरजेचे असलेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला नेण्याचा निर्णय झाल्यावर ‘सकाळ’ने सोलापुरातील तृणधान्याखालील क्षेत्र, शेतकरी संघटना, विरोधक, शेतकरी उत्पादक कंपन्या व गट यांची मते जाणून घेत त्यावरील वृत्त प्रकाशित केले. तसेच याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. अखेर सरकारने हे केंद्र सोलापुरातच स्थापन करण्याचा बुधवारी निर्णय घेत शासन आदेश जाहीर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com