राज्यातील नाट्यगृह होणार ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

नाटकाला तारतेय स्वाइप कार्ड सिस्टिम
चलनाच्या तुटवड्यामुळे अभिजित साटम यांच्या कंपनीच्या वतीने नाट्यगृहांमध्ये स्वाइप मशिन (पॉज सिस्टिम) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुंबई, पुणे, नाशिक आदी ठिकाणी या पद्धतीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चलन चणचणीमुळे 60 ते 70 टक्के प्रेक्षक आता कार्ड पेमेंट करत आहेत. त्यामुळे केवळ चलनाच्या अडचणीमुळे जे प्रेक्षक नाटकांना यायचे टाळत होते, त्यांना हा पर्याय उपलब्ध झाल्याने नाट्य व्यवसायालाही बळकटी मिळत आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन बुकिंगसारखे यामध्ये जादा पैसेही जात नाहीत. हवे ते तिकीट तत्काळ उपलब्ध होत असल्यामुळे या सिस्टिमने नाट्य व्यवसायाला सध्या तरी तारले असल्याचे साटम यांनी सांगितले.

सुरवात पुण्यापासून; तिकिटासाठी यंत्रणेचे आधुनिकीकरण

मुंबई :  नोटबंदीचा फटका मराठी नाट्य व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर बसला असून, लवकरच नाटकाची संपूर्ण तिकिटे ऑनलाइनवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या काही जागांसाठी ऑनलाइन तिकीट उपलब्ध करून देणाऱ्या तिकिटीज डॉट कॉमच्या वतीने प्रयत्न होत असून, त्याची सुरवात पुण्यातून होणार असून, टप्प्याटप्प्याने सर्व तिकिटे ऑनलाइनवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

नोटाबंदीचा मोठा फटका नाट्य व्यवसायाला बसला आहे. कारण सिनेमांची तिकिटे ऑनलाइनवर सहज उपलब्ध असतात; मात्र नाट्यगृहावर ना संपूर्ण ऑनलाइन बुकिंगची सोय असते, ना स्वाइप कार्डचा पर्याय असतो. त्यामुळे अनेक निर्मात्यांनी शक्कल लढवत धनादेशाचा पर्याय खुला केला आणि या पर्यायाला चांगला प्रतिसाद मिळाला. संपूर्ण नाट्यगृहातील तिकिटे ऑनलाइनवर मिळण्यासाठी थिएटरची सिस्टिम अपडेट करणे आवश्‍यक होते. त्याचप्रमाणे अनेक तांत्रिक अडचणींसोबत नाट्यगृहांच्या परवानग्यांचाही मुद्दा होता. "तिकिटीज'च्या टीमच्या वतीने सध्या या तांत्रिक मुद्द्यावर काम झाले असून, आता त्यानुसार थिएटरमधील जागा उपलब्ध करून देणे निर्मात्यांना शक्‍य होणार असल्याची माहिती तिकिटीजचे भालचंद्र गायकवाड यांनी दिली. सध्या तिकिटीजवर कोणताही निर्माता त्याच्या नाटकाचा शो उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्याच्या तिकिटांची विक्रीही करू शकतो. मात्र तरीही सर्व नाट्यगृहांना इंटरनेटचा प्रश्‍न असून, त्याचा केवळ डोंगल स्वरूपात तात्पुरता मार्ग न काढता नाट्यगृहांना कायमस्वरूपी इंटरनेट सेवा उपलब्ध कशी होईल याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी अभिजित साटम यांनी पुढाकार घेतला असून, त्यासंदर्भात नाट्यगृहांशी पत्रव्यवहारही केला असून, येत्या साधारण महिनाभरात याची पूर्तता होणार असून, त्यानंतर राज्यातील संपूर्ण नाट्यगृहांचा संपूर्ण प्लॅन ऑनलाइन उपलब्ध होईल. त्याची सुरवात पुण्यातून होणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने मुंबई, नाशिक येथेही ही सेवा उपलब्ध होईल, अशी माहिती तिकीटीज टीम त्याचप्रमाणे "कॉम कॉम' कंपनीचे अभिजित साटम यांनी दिली.

 

Web Title: The theater will be online