नऊ लाख पशुधन छावण्यांच्या सावलीत

सिद्धेश्‍वर डुकरे 
बुधवार, 15 मे 2019

राज्याला दुष्काळाच्या तीव्र झळा बसत आहेत. चारा आणि पाण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यामुळे राज्यातील ग्रामीण भागात चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. सध्या नऊ लाख पशुधन या छावण्यांत आहे. दरदिवशी चारा छावण्यांची मागणी वाढत आहे.

मुंबई - राज्याला दुष्काळाच्या तीव्र झळा बसत आहेत. चारा आणि पाण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यामुळे राज्यातील ग्रामीण भागात चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. सध्या नऊ लाख पशुधन या छावण्यांत आहे. दरदिवशी चारा छावण्यांची मागणी वाढत आहे. या चारा छावण्या शेतकऱ्यांची लाखमोलाची संपत्ती असणाऱ्या जनावरांच्या आगार बनल्या आहेत.

नगदी पिकांसाठी पाण्याचा बेसुमार वापर करणे, सूक्ष्म सिंचनाच्या साधनांचा वापर न करणे, हजार फुटापेक्षा जास्त खोल कूपनलिका मोठ्या प्रमाणात घेतल्याने पाण्याची पातळी खोल खोल जाणे, सर्व प्रकारच्या धरणांत गाळ साठल्याने पाण्याचा साठा कमी होणे, मॉन्सूनच्या पावसाचा लहरीपणाचा फटका बसणे, पाण्याचे नियोजन नसणे, या कारणांमुळे पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी दिली जात आहे. नगरमध्ये ४९३ छावण्या, सातारा १९, सांगली ३, सोलापूर १२५, औरंगाबाद ९, जालना १४, बीड ६०१, उस्मानाबाद ८४ या जिल्ह्यांत चारा छावण्या उभारल्या आहेत. यासाठी राज्य सरकार अनुदान देत आहे. सगळ्यात जास्त चारा छावण्या बीड जिल्ह्यात असून, त्या खालोखाल नगर जिल्ह्यांत चारा छावण्या आहेत. या छावण्यांत गाय, बैल, म्हैस या मोठ्या जनावरांप्रमाणे शेळी, मेंढी अशा छोट्या जनावरांचा समावेश आहे. मोठ्या जनावरांना दिवसाला १८ किलो चारा, तर छोट्या जनावरांना नऊ किलो चारा पुरविला जातो. यासाठी मोठ्या जनावरांना प्रति ९० रुपये, तर छोट्या जनावरांना प्रति ४५ रुपये इतके अनुदान दिले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are nine lakh livestock fodder camps