गुंडांचा सामना करण्याचे त्यांना मिळाले बळ!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

विद्यार्थिनींना भावल्या अंजलींच्या टिप्स! 

आवाजातील ताकद, वेगाने पळणे, गुडघ्याने मारा, नाकावर ठोसा, माती डोळ्यांत टाकणे, हाताच्या पंजाचा ठोसा, बरगडीवर बुक्का, करंगळी दुमडणे, डोक्‍याचा ठोसा, हातात येईल ती वस्तू शस्त्र म्हणून वापर, चौफेर नजर व आत्मविश्‍वास या स्वसंरक्षणाच्या टिप्स देत अंजली यांनी प्रात्यक्षिके करून दाखविली. टिप्स व प्रात्यक्षिके विद्यार्थिनींना भावली.

कोपर्डी (जि. नगर) - वासनांध गुंडांकडून मैत्रिणीचा खून झाल्याने आठवड्यापासून दहशतीत असलेल्या कोपर्डी परिसरातील तब्बल सातशे रणरागिणींना प्रात्यक्षिकांसह स्वसंरक्षणाच्या टिप्स मिळाल्या आणि गुंडांचा सामना करण्याचे बळही! मैत्रीण निर्भयाच्या जाण्याचे शल्य मनात चीड निर्माण करीत असतानाच स्वतःच्या बचावासाठी आता त्या सरसावल्या आहेत. इतकेच नव्हे, तर गुंडांना न घाबरता नियमितपणे शाळेत जाऊन आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करण्याची शपथही त्यांनी घेतली. 

कोपर्डी गावाशेजारच्या कुळधरण (ता. कर्जत) या गावातील नूतन मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोपर्डी पंचक्रोशीतील सुमारे सातशे विद्यार्थिनी पाचवी ते बारावीच्या वर्गांत शिक्षण घेत आहेत. याच शाळेत कोपर्डीतील निर्भया नववीत होती. या आपल्या मैत्रिणीवर झालेले अत्याचार व खून प्रकरणामुळे विद्यार्थिनी भयभीत झाल्या आहेत. तथापि, त्यांच्यातील भीती दूर करून गुंडांचा सामना करण्याचे धैर्य त्यांच्यात पुन्हा निर्माण करण्याचे "सकाळ‘च्या तनिष्का व्यासपीठाच्या कर्जत येथील गटाने ठरविले. त्यानुसार नगर येथील आंतरराष्ट्रीय ज्यूदोपटू व कुस्तीच्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक आणि नगरच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमधील शारीरिक शिक्षक अंजली देवकर-वल्लाकट्टी यांना विद्यार्थिनींना लाठीकाठी, ज्यूदो व कराटेच्या प्रात्यक्षिकांसह स्वसंरक्षणाचे धडे देण्याची विनंती केली. देवकर यांनीही त्यास होकार दिला. 

 

"सकाळ‘चे निवासी संपादक ऍड. बाळ ज. बोठे पाटील यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाची शपथ दिली. तनिष्काच्या माध्यमातून जिल्हाभर विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याची मोहीम "सकाळ‘ने हाती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: They have the strength to face the