‘थर्टी फर्स्ट’साठी हिमाच्छादित शिखरांना पसंती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

पुणे - मराठी माणसांनी यंदाच्या ‘थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन’साठी हिमालय आणि वाळवंट यांना प्राधान्य दिले आहे. त्याची सुरवात ‘व्हाइट ख्रिसमस सेलिब्रेशन’पासूनच झाली असल्याची माहिती पुढे येत आहे. 

पुणे - मराठी माणसांनी यंदाच्या ‘थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन’साठी हिमालय आणि वाळवंट यांना प्राधान्य दिले आहे. त्याची सुरवात ‘व्हाइट ख्रिसमस सेलिब्रेशन’पासूनच झाली असल्याची माहिती पुढे येत आहे. 

कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या वर्षअखेरीस राहिलेल्या सुट्या आणि मुलांच्या शाळांना असलेली नाताळची सुटी यामुळे यंदा मराठी लोकांनी राज्याबाहेर ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्यास प्राधान्य दिले आहे. या सुट्यांची सुरवात शनिवारपासून (ता. २२) झाली असून, ३१ डिसेंबरपर्यंतचे नियोजन करून मराठी पर्यटक बाहेर पडले आहेत. नाताळच्या सुट्या लागताच मराठी माणसांनी महाराष्ट्राचा निरोप घेऊन थेट हिमालय गाठल्याचे चित्र आहे, असे निरीक्षण वेगवेगळ्या पर्यटक कंपन्यांनी ‘सकाळ’शी बोलताना नोंदवले.

‘केसरी’च्या संचालिका झेलम चौबळ म्हणाल्या, ‘‘युरोपमध्ये नाताळात सर्वत्र बर्फ असतो. आपल्याकडे त्याच धर्तीवर नाताळची सुटी बर्फाच्छादित प्रदेशात पर्यटनासाठी जाण्याचा कल वाढत आहे. त्यामुळे ‘व्हाइट ख्रिसमस’ साजरा करण्याकडे ओढा वाढत आहे. त्यामुळे काश्‍मीर, नैनिताल, सिमला, कुलू, मनाली येथे पर्यटक गेले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतदेखील या हिमवर्षावात करण्याकडे पर्यटकांचा कल आहे. दरवर्षी डिसेंबरमध्ये केरळला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. परंतु यंदा राजस्थानला प्राधान्य दिले आहे. त्या पाठोपाठ अंदमान आहे.’’ 

हिवाळ्यातील पर्यटन म्हणजे समुद्र किनारा किंवा बेटांवर जाण्यासाठी पर्यटकांचा कल असतो. या बाबत ‘गायकवाड हॉलिडेज’चे कॅप्टन नीलेश गायकवाड म्हणाले, ‘‘मराठी लोकांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांना प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर काही पर्यटकांनी अंदमान, निकोबारसारख्या बेटांनाही पसंती दिल्याचे दिसत आहे.’’

‘मॅंगो हॉलिडेज’चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद बाबर म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील पर्यटनासाठी गणपतीपुळे, तारकर्ली, हरिहरेश्‍वर अशा समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांनी प्राधान्य दिले आहे.’’

पर्यटनाची सर्व स्थळे बघण्यापेक्षा आपल्या कुटुंबासोबत, मित्र-मैत्रिणींसोबत एकत्र जास्त वेळ घालविणे, हा असा आधुनिक काळातील पर्यटनाचा उद्देश आहे. त्यामुळे या दृष्टीने नियोजन करताना पर्यटकांनी यंदा उत्तर भारताला पसंती दिली असल्याचे निरीक्षण भाग्यश्री ट्रॅव्हल्स’चे विवेक गोळे यांनी टिपले. ते म्हणाले, ‘‘नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्तर भारतातील मनाली, नैनिताल येथे जाण्याला पसंती दिली आहे. दक्षिणेत केरळमध्ये काही पर्यटक गेले आहेत. तसेच महाबळेश्‍वर, माथेरान या जवळच्या ठिकाणीही काही पर्यटकांनी ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्याचे नियोजन केले आहे.’’

आपल्याकडच्या महाबळेश्‍वर, माथेरान, लोणावळा येथे थंडी असते. पण हिमवर्षावात कडाक्‍याची थंडी अनुभवण्यासाठी आणि त्यातही ‘थर्टी फर्स्ट’ संस्मरणीय करण्यासाठी मनालीला जाण्याचे निश्‍चित केले आहे.
- संजय कुलकर्णी, पर्यटक 

राजस्थानने खेचले केरळचे पर्यटन
यंदाच्या पावसाळ्यात केरळमध्ये जलप्रलय झाला होता. केरळचा बहुतांश भाग पाण्याखाली बुडाला होता. त्याचा फटका केरळच्या पर्यटनाला बसला. गेल्या काही महिन्यांपासून केरळमधील पर्यटन पूर्ववत करण्याचे वेगाने प्रयत्न सुरू आहेत, पण यंदा केरळऐवजी राजस्थानला पर्यटकांनी पसंती दिली आहे. त्यातही पश्‍चिम राजस्थानमधील वाळवंटी भागाला प्राधान्य दिले असल्याचेही निरीक्षण पर्यटन व्यावसायिकांनी नोंदविले आहे.

Web Title: Thirty First Celebration Tour Glacial peak