esakal | तीन IPS अधिकाऱ्यांची पोलिस महासंचालकपदी बढती

बोलून बातमी शोधा

DGP Maharashtra

डॉ. वेंकटेशम हे १९८८, तर बिष्णोई आणि फणसळकर हे १९८९च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत.

तीन IPS अधिकाऱ्यांची पोलिस महासंचालकपदी बढती
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ठाणे शहराचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर (Vivek Phansalkar IPS) यांच्यासह तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना मंगळवारी पोलिस महासंचालकपदी (DGP) बढती देण्यात आली. पुढील आदेशापर्यंत ठाण्याचे सह पोलिस आयुक्त सुरेश कुमार मेखला पोलिस आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत. (Three IPS officers promoted to rank of director general by Maharashtra Govt)

फणसळकर यांची पदोन्नती अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. त्यानुसार त्यांना पोलिस महासंचालक म्हणून पदोन्नती देण्यात आली असून त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे.

हेही वाचा: कोरोना लढ्यात RBIचा पुढाकार; आरोग्य सेवेसाठी ५० हजार कोटी

तसेच अप्पर पोलिस महासंचालक (विशेष कृती अभियान, मुंबई) डॉ. के. वेंकटेशम यांनाही महासंचालकपदी बढती देण्यात आली असून त्यांची नागरी संरक्षणच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. वेंकटेशम यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस आयुक्त पदही भूषविले होते.

याशिवाय संदीप बिष्णोई या मुंबईतील लोहमार्ग विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनाही पदोन्नती देऊन न्यायिक व तांत्रिक विभागाच्या महासंचालकपदी त्यांची नियुक्ती केली आहे. डॉ. वेंकटेशम हे १९८८ तर बिष्णोई आणि फणसळकर हे १९८९च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. त्यांच्या पदोन्नतीमुळे पुढील बॅचच्या बढतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा: अनिल देशमुखांचा पाय खोलात? मुलांच्या कंपन्यांवर CBIची नजर

गेल्या काही महिन्यांपासून डीजीपी दर्जाची तीन पदे रिक्त असूनही त्याकडे वारंवार दुर्लक्ष होत होते. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणानंतर गेल्या महिन्याभरात पोलिस दलात अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे गेल्या आठवड्यात बढतीसंदर्भात आस्थापना मंडळाची बैठक पार पडली. यावेळी सेवा ज्येष्ठतेनुसार तिघांच्या बढतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.