esakal | कोरोना लढ्यात RBIचा पुढाकार; आरोग्य सेवेसाठी ५० हजार कोटी

बोलून बातमी शोधा

RBI

आरबीआय देशभरातील कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिक, व्यापारी त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना आवश्यक मदत करण्यात येईल.

कोरोना लढ्यात RBIचा पुढाकार; आरोग्य सेवेसाठी ५० हजार कोटी
sakal_logo
By
एएनआय वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Corona 2nd wave) देशभरात हाहाकार माजला आहे. दररोज कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. जगभरातून मदतीसाठीचा ओघ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी आरबीआयतर्फे मदत जाहीर केली. याबाबतची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. (RBI governor Shaktikant Das announces loan relief and 50 thousand crore liquidity to tackle 2nd wave)

आरबीआयने आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी सुमारे ५० हजार कोटी रुपये मदत जाहीर केली आहे. दास म्हणाले की, आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी ही सर्व रक्कम देण्यात येत आहे. याद्वारे बँक लसीचे उत्पादन, लसीची वाहतूक तसेच निर्यातदारांना सुलभ हप्त्यांमध्ये कर्ज उपलब्ध करून देईल. याचा फायदा हॉस्पिटल्स आणि आरोग्य सेवा पुरवणाऱ्यांना होईल. किरकोळ आणि छोट्या व्यावसायिकांना गव्हर्नर दास यांनी दिलासा दिला आहे. प्राइरोरिटी सेक्टरसाठी तत्काळ कर्ज आणि इन्सेंटिव्ह देण्याची तरतूद केली जाईल. याशिवाय बँक कोविड बँक कर्जासंदर्भातही पाऊल उचलेल.

हेही वाचा: IPL स्थगित झाल्याने BCCIला २२०० कोटींचा फटका

आरबीआय देशभरातील कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिक, व्यापारी त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना आवश्यक मदत करण्यात येईल. आयएमडीने यावर्षी सर्वसाधारण पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे २०२१-२२ मध्ये ग्रामीण मागणी आणि एकूण उत्पादन स्थिर राहील. त्यामुळे चलनवाढीवर त्याचा जास्त परिणाम होणार नाही.

तसेच बँक खाते उघडण्यासाठी केवायसीला मंजूरी देण्यात आली. सद्यस्थिती पाहता केवायसीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता व्हिडिओद्वारेही केवायसीला मंजूरी देण्यात आली आहे. एप्रिलमध्ये गेल्यावर्षीपेक्षा रेल्वे मालवाहतुकीत ७६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एप्रिल २०२१ मध्ये ऑटोमोबाईल नोंदणी मार्चच्या तुलनेत कमी झाली. पण ट्रॅक्टर विभागात तेजी आल्याचे पाहायला मिळाल्याचे दास यांनी म्हटले.

हेही वाचा: अँटीजेन, आरटी-पीसीआर टेस्टची पुन्हा गरज नाही

तृणधान्य आणि डाळींच्या किंमती आणि पुरवठा चांगला राहण्यात सामान्य स्वरुपाचा पाऊस मुख्य भूमिका बजावतो. एप्रिल २०२१ पर्यंत आयात निर्यातीमध्ये वाढ झाली आहे. परकीय चलन साठ्यामुळे जागतिक स्तरावर गती वाढविण्याचा आत्मविश्वास आला आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात दररोज साडे तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. गेल्या २४ तासात ३ हजार ४०० हून अधिकांचा मृत्यू झाला आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.