उस्मानाबादकरांचे तीन जावई मंत्रिपदी

राजेंद्र जाधव
सोमवार, 30 डिसेंबर 2019

1995 मध्ये जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार होते. त्यानंतर म्हणजे तब्बल 24 वर्षांनंतर शिवसेनेचे तीन आमदार जिल्ह्यात निवडून आले. त्यामुळे या वेळी जिल्ह्याला मंत्रिमंडळात निश्‍चित स्थान मिळेल, अशीच अपेक्षा होती; परंतु ती फोल ठरली.

उस्मानाबाद : जिल्ह्याचा खासदार, अन्‌ चारपैकी तीन आमदार शिवसेनेचे असतानाही उस्मानाबाद जिल्ह्याला राज्याच्या विस्तारित मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. असे असले तरी उस्मानाबाद तालुक्‍यातील तीन जावई मात्र मंत्री झाले आहेत. त्यात एक कॅबिनेट, एक राज्यमंत्री, तर एक जण राज्याचा उपमुख्यमंत्रीच आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेचा खासदार आहे. चार मतदारसंघापैकी उस्मानाबाद, परंडा व उमरगा मतदारसंघांत शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत. गेल्या पंचवार्षिकमध्ये शेवटच्या तीन महिन्यांचा अपवाद वगळता मंत्रिमंडळात जिल्ह्याला स्थान मिळाले नाही. तीन महिन्यांसाठी शिवसेनेचे प्रा. तानाजी सावंत यांना कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान देण्यात आले होते. त्यामुळे आताच्या पंचवार्षिकमध्ये विस्तारित मंत्रिमंडळामध्ये प्रा. सावंत यांची वर्णी लागेल, अशी चर्चा होती. 

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

परंतु सोमवारी (ता. 30) झालेल्या विस्तारित मंत्रिमंडळात प्रा. सावंत यांनाही स्थान देण्यात आले नाही. याशिवाय सलग तीन वेळा उमरगा मतदारसंघातून निवडून शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांना किमान राज्यमंत्री म्हणून संधी मिळेल, अशी अपेक्षा उमरगा व लोहारा तालुक्‍यांतील नागरिकांना होती. मात्र चौगुले यांनाही स्थान मिळाले नाही. 

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही

1995 मध्ये जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार होते. त्यानंतर म्हणजे तब्बल 24 वर्षांनंतर शिवसेनेचे तीन आमदार जिल्ह्यात निवडून आले. त्यामुळे या वेळी जिल्ह्याला मंत्रिमंडळात निश्‍चित स्थान मिळेल, अशीच अपेक्षा होती; परंतु ती फोल ठरली.

तीन जावईच मंत्री

जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीन आमदारांपैकी एकालाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसले, तरी उस्मानाबाद तालुक्‍यातील तीन जावयांना मात्र स्थान मिळाले आहे. तेरचे जावई असलेले अजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. श्री. पवार हे तेर येथील बाजीराव पाटील यांचे जावई आहेत.

उस्मानाबाद तालुक्‍यातील उपळे (मा.) येथील जावई असलेले राजेश टोपे यांचीही कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. उपळे (मा.) येथील विक्रम पडवळ यांचे श्री. टोपे हे जावई आहेत. 

उस्मानाबाद तालुक्‍यातील ढोकीचे जावई असलेले प्राजक्त तनपुरे यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. ढोकी येथील उद्योगपती सुभाष देशमुख यांचे श्री. तनपुरे हे जावई आहेत. श्री. तनपुरे यांचा राज्यमंत्रिमंडळात समावेश झाल्याचे समजताच ढोकी गावात दुपारनंतर फटाक्‍यांची आतपबाजी करून सासरवाडीच्या लोकांनी जल्लोष केला. गावात ठिकठिकाणी अभिनंदनाचे फलकही लावण्यात आले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Son-in-Laws Of Osmanabad Became Ministers in Maharashtra Government