कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही 

बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने काढलेला माेर्चा.
बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने काढलेला माेर्चा.

बीड - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि नागरिक नोंदणी कायद्याला विरोध करीत शुक्रवारी (ता. 20) बीडमध्ये निघालेल्या मोर्चादरम्यान काही लोकांनी हुल्लडबाजी करीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर तुफान दगडफेक करून नागरिक आणि पोलिसांच्या जीविताला धोका निर्माण होईल असे कृत्य केले. शहर व जिल्ह्यात यापुढे कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनांना परवानगी दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

बीड येथे शुक्रवारी कॅब व एनआरसी कायद्याच्या विरोधात बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी बशीरगंज ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात साधारण दीड ते दोन हजार लोक सहभागी झाले होते. मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलेला असताना काही संतप्त तरुणांनी परळी-पाटोदा बसवर तुफान दगडफेक केली. त्यात बसच्या सर्वच काचा फुटल्या. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

पथसंचलन करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले. यानंतर शनिवारी (ता. 21) सकाळी अधीक्षक कार्यालयात पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी अपर अधीक्षक विजय कबाडे उपस्थित होते. 

पोद्दार म्हणाले, शहरात झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी 30 जणांना ताब्यात घेतले असून, यापुढे कॅब आणि एनआरसीसंदर्भातील मोर्चांना पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. ताब्यात घेतलेले तरुण 18 ते 23 वर्षे वयोगटातील असून एकूण 80 ते 100 जणांवर दगडफेक केल्याप्रकरणी भादंविचे कलम 307, 353, 332, 336, 143, 145, 147, 148, 149, 151, 152, 186, 188, 427 तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायद्याचे सहकलम 3 महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 135 व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्‍ट 1932 चे कलम सातनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा : औरंगाबादचे झाले काश्‍मीर  

पोलिस अधिकाऱ्यांचे कौतुक 
दगडफेकीमागे काही पक्ष किंवा संघटनांचा संबंध आहे की नाही, हे तपासादरम्यान निष्पन्न होईल, असे सांगत पोद्दार म्हणाले, बीडमध्ये शुक्रवारी निर्माण झालेली कायदा सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अपर अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्यासह शहरातील सर्व ठाणेप्रमुखांनी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी यशस्वी कामगिरी केली. याबद्दल त्यांचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कौतुक केले. कौशल्यपूर्ण काम करीत परिस्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल एसआरपीएफच्या तुकडीला रिवॉर्ड जाहीर केल्याचेही पोद्दार यांनी सांगितले. 

अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई 
पोलिस प्रशासनाने एक निवेदन जारी केले. "आम्ही बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्पष्ट छायाचित्रे घेतली असून या पुतळ्याची कोणत्याही प्रकारची विटंबना झालेली नाही, असे स्पष्ट करत यासंदर्भात सोशल मीडिया व इतर माध्यमातून कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. बीड पोलिस 24 तास सोशल मीडियावर करडी नजर ठेवून आहेत,' असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

अभाविपचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 
संसदेच्या दोन्ही सभागृहांत ऐतिहासिक नागरिकत्व सुधारणा विधेयक बहुमताने पारित झाले आहे. राष्ट्रपतींची विधेयकावर स्वाक्षरी झाल्यानंतर हा कायदा महाराष्ट्रात तत्काळ लागू करण्यात यावा, अशी मागणी करीत शनिवारी (ता. 21) सकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे महाराष्ट्रातील विद्यार्थी, नागरिक तसेच विद्यापीठे आणि महाविद्यालये अशा सर्व ठिकाणी स्वागत केले असताना महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या एका मंत्र्याने या विधेयकाच्या विरोधात वक्तव्य केले आहे. कॉंग्रेसची ही भूमिका संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमची मागणी आहे की, राज्यातील निर्वासित हिंदू, बौद्ध, जैन, शीख, पारसी, ख्रिश्‍चन बांधवांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा विधेयकाची तत्काळ राज्यात अंमलबजावणी करावी व या विधेयकाबद्दल समाजात निर्माण झालेला संभ्रम प्रशासनाने दूर करावा. यावेळी अभाविप पदाधिकाऱ्यांसह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शिवाजीनगर पोलिसांसह दंगल नियंत्रक पथक तैनात करण्यात आले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com