वाघांची नक्की संख्या कळणार

राजेश रामपूरकर
मंगळवार, 16 जुलै 2019

जगातील ७० टक्के वाघ भारतात
जगातील ७० टक्के वाघ भारतात आहेत. वाघांच्या प्रजाती झपाट्याने लुप्त होत असताना भारतात मात्र याच वाघाला वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात व अत्यंत गांभीर्यपूर्ण प्रयत्न होत आहेत. देशांगर्तत केलेल्या मागील तीन व्याघ्रगणनेत वाघांच्या संख्येत वाढ दिसली आहे.

नागपूर - देशात वाघांची संख्या नेमकी किती आहे, त्यात वाढ झाली की घट, याची आकडेवारी येत्या व्याघ्र दिनाच्या दिवशी (ता. २९ जुलै) जाहीर हेण्याची शक्‍यता आहे. देशभरातील १९ राज्यांतील जंगलात रेषा विभाजन पद्धतीने (लाइन ट्रॅन्झॅक्‍ट मेथड) व्याघ्रगणनेसोबतच वनांची स्थिती, वनस्पती, वृक्ष, जलचर, उभयचर पक्षी, प्राणी, मानवी हस्तक्षेपांची माहिती गोळा करण्यात आली आहे.

डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेने विकसित केलेल्या रेषा विभाजन पद्धतीने २००६ मध्ये प्रथमच देशभरात व्याघ्रगणना करण्यात आली होती. या वर्षीही त्याच पद्धतीने जानेवारी २०१८ पासून देशभरातील जंगलात व्याघ्रगणना करण्यात आली. गेल्या वेळेस १८ राज्यांत व्याघ्रगणना करण्यात आली होती.

यंदा नागालॅंडचा समावेश केल्याने ही संख्या आता १९ वर पोचली आहे. गणनेचे सर्व टप्पे राज्यातील वन विभाग राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शनात भारतीय वन्यजीव संस्थेच्या मदतीने पूर्ण झालेले आहेत. त्यावर आधारित माहिती विश्‍लेषणाचे कामही भारतीय वन्यजीव संस्थेचे संपले आहे. त्यामुळेच देशभरातील वाघांची आकडेवारी व्याघ्रदिनी जाहीर होण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली. 

राज्यात गेल्या चार वर्षांत व्याघ्र प्रकल्पांतील २३ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. तसेच, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी जंगलालगतच्या गावांत श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राबविण्यात आली. याशिवाय, वन्यजीव संवर्धनाशी निगडित अनेक कामे आणि शिकाऱ्यांना जेरबंद करून त्यावर निर्बंध आणले. व्याघ्र दिनाच्या दिवशी देशातील वाघांची संख्या जाहीर झाल्यास ते कळणार, हे मात्र नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tiger Counting Forest