
डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ३३१ वाघ आणि ६६९ बिबटे आहे. ही आकडेवारी अधिक असण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, जळगाव आणि धुळे वन विभागात वाघ आणि बिबट्याचा चौथ्या टप्प्याचा मागोवा घेण्यात आला नाही.
नागपूर : राज्यात २०२० मध्ये कॅमेरा ट्रॅपच्या सहाय्याने चौथ्या टप्प्यात घेतलेल्या मागोव्यात ३३१ वाघ आण ६६९ बिबटे असल्याची नोंद झाली आहे. २०१८ च्या गणनेत राज्यात ३१२ वाघांची नोंद झाली होती. त्यानंतर दोनच वर्षांत १९ वाघांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ३३१ वाघ आणि ६६९ बिबटे आहे. ही आकडेवारी अधिक असण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, जळगाव आणि धुळे वन विभागात वाघ आणि बिबट्याचा चौथ्या टप्प्याचा मागोवा घेण्यात आला नाही. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातही ही प्रक्रिया झाली नाही. दर चार वर्षांनी होणाऱ्या वाघाची गणना २०१८ मध्ये झाली होती. त्याची आकडेवारी २०१९ मध्ये जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने त्याची पुर्नतपासणी करण्यासाठी वाघाचा अधिवास असलेल्या परिसरात चौथा टप्पा राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हा टप्पा पार पाडण्यात आला असून त्यात ही आकडेवारी पुढे आली आहे. २०२० ची आकडेवारी आणि २०१८ ची आकडेवारी जवळपास सारखी आहे. राज्यात चौथ्या टप्प्यात नोंद झालेल्या ६६९ बिबट्यांपेक्षा ही संख्या अधिक असावी असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. २०१४ मध्ये १९० वाघांची नोंद झाली होती.
राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे म्हणाले, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने १८ महिन्याच्या खालील वाघांची नोंदणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे वाघांची संख्या वाढलेली दिसत असावी. याशिवाय केंद्र सरकार गणना करीत असताना दोन राज्यात दिसणाऱ्या वाघाला एका राज्यातून वगळून टाकते. मात्र, राज्य सरकारने केलेल्या गणनेत तशी कोणतीही सोय नसते. त्यामुळे बाहेरच्या राज्यातून काही कालावधीसाठी महाराष्ट्राच्या जंगलात एखादा वाघ आला. त्याची नोंद कॅमेरा ट्रॅपमध्ये झाल्यास त्याचीही गणना राज्यात केली जाते. या दोन कारणामुळे वाघ वाढलेले असावेत. वाढ होणे हे अपेक्षितच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चार डिसेंबरला बैठक -
राज्य वन्यजीव मंडळाची बैठक चार डिसेंबर रोजी होणार आहे. त्यात अमरावती जिल्ह्यातील महिंद्री या प्रस्तावित अभयारण्याच्या प्रस्तावासह इतरही विषयांवर चर्चा होणार आहे.