अवनीची शिकार बेकायदेशीर; चौकशी समितीचा ठपका

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनी (टी-1) हिची शिकार कायद्यांचे उल्लंघन करून करण्यात आली, असा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) नेमलेल्या चौकशी समितीने ठेवला आहे. या अहवालात शफाअत अली खान आणि त्याचा मुलगा असगर अली खान यांनी पावलोपावली नियमांचे उल्लंघन केल्याचेही स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
 

नागपूर- पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनी (टी-1) हिची शिकार कायद्यांचे उल्लंघन करून करण्यात आली, असा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) नेमलेल्या चौकशी समितीने ठेवला आहे. या अहवालात शफाअत अली खान आणि त्याचा मुलगा असगर अली खान यांनी पावलोपावली नियमांचे उल्लंघन केल्याचेही स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

अवनीच्या शिकारीनंतर राज्यभरातून वाद-प्रतिवाद सुरू झाले. यात राजकीय हस्तक्षेपाची शंकाही व्यक्त करण्यात आली. दरम्यान, एनटीसीएने संपूर्ण प्रक्रियेची सविस्तर चौकशी करण्याचा निर्णय घेऊन 8 नोव्हेंबरला तीन सदस्यीय समिती नेमली. यात निवृत्त अतिरिक्त प्रधान वनसंरक्षक ओ.पी. कालेर, वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाचे उपसंचालक जोस लुईस आणि एनटीसीएच्या नागपूर विभागीय कार्यालयाचे एआयजी हेमंत कामडी यांचा या समितीत समावेश होता. या समितीने राज्य सरकारकडे सोपविलेल्या अहवालात वनकायदा, शस्त्रकायदा आदींचे उल्लंघन करण्यात आल्याचे स्पष्ट पण म्हटले आहे.

2 नोव्हेंबरला असगर अली खान याने गोळी झाडून अवनीची शिकार केली. पण, मुळात असगर अलीची नियुक्ती या कामासाठी करण्यात आलीच नव्हती. शिवाय त्याने ज्या बंदुकीने गोळी झाडली त्या बंदूकीचा परवानाही शफाअत अली खानच्या नावावर होता. ज्यावेळी अवनीवर गोळी झाडण्यात आली त्यावेळी घटनेच्या ठिकाणी शफाअत अली खान उपस्थित नव्हता आणि असगरकडे ही बंदूक वापरण्यासंदर्भात ऍथॉरिटी लेटरही नव्हते, ही बाब चौकशीत आढळून आली आहे. त्यातही असगर अलीला चौकशीदरम्यान बंदुकीचे मॉडेलही आठवले नाही. मुखबीर शेखने अवनीला बेशुद्ध करण्यासाठी ज्या औषधाचा मारा केला, त्याची वैधता 32 तासांपूर्वीच संपलेली होती. मुख्य म्हणजे मुखबीरने बेशुद्ध करण्यासाठी मारा केल्यावर परिणामाची प्रतीक्षा करायला हवी होती. पण, अवघ्या तीनच सेकंदात असगर अलीने अवनीवर गोळी झाडली. चौकशीमध्ये असगर अली खानने स्वसंरक्षणार्थ गोळी झाडल्याचे म्हटले आहे. मात्र, अशापद्धतिची कुठलिही परिस्थिती उद्‌भवली नसल्याचे चौकशीअंती सिद्ध झाल्याचे समितीने अहवालात नमूद केले आहे.

वाघीण हल्ला करेल अशी शंका असती तर गोळीचे निशान तिच्या डोक्‍यावर दिसले असते मात्र, तिच्यावर मागच्या भागाने गोळी झाडण्यात आली आहे. हे ऑपरेशन करताना बॅकअप टीम सोबत नव्हती. बेशुद्ध केल्यावर वाघीणीला नेण्यासाठी आवश्‍यक असलेली गाडी नऊ किलोमीटर लांब होती. घटनेच्या ठिकाणी पशुवैद्यकही उपलब्ध नव्हते, या बाबी ठळकपणे नमूद करण्यात आल्या आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमने 3 नोव्हेंबरला अवनीला बेशुद्ध करण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्यापूर्वीच म्हणजे 2 नोव्हेंबरलाच असगर अलीने ही शिकार केली, असेही अहवालात म्हटले आहे.

अहवालातील ठळक मुद्दे 
- घटनेच्या दिवशी वाघीण आक्रमक नव्हती 
- असगर अलीकडे बंदुकीचा परवानाच नाही 
- बेशुद्ध केल्यानंतर अवघ्या तीन सेकंदार झाडली गोळी 
- टीममधील कुठल्याही सदस्याकडे अनुभव नव्हता 
- शिकार करताना संयम बाळगला नाही 

शफाअत अली खानची नियुक्ती झाली त्या दिवसापासून प्रक्रियेत घोळ असल्याचे आम्ही म्हणतोय. एनटीसीएच्या चौकशी अहवालाने ते सिद्ध केले. - जेरिल बानाईत, वन्यजीव प्रेमी

Web Title: Tigress Avni Was Shot Using Unauthorised Weapon; Shooter Asghar Violated 3 Laws