शौचालय लाभार्थ्यांची "आधार'शी लिंक वेगात!

सिद्धेश्‍वर डुकरे
सोमवार, 14 मे 2018

मुंबई - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यातील शहरी, तसेच ग्रामीण भाग हागणदारीमुक्‍त करण्याचा विडा राज्य सरकारने उचलला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शहरी भागातील वैयक्‍तिक शौचालय लाभार्थींना "आधार'शी जोडण्यात येत असून, यासाठी नगरविकास विभाग कामाला लागला आहे. आतापर्यंत सुमारे दोन लाख 70 हजार वैयक्‍तिक शौचालय लाभार्थी आधार कार्डशी जोडण्यात आले आहेत. तरीही अद्याप पन्नास टक्‍के आधार जोडणी बाकी आहे.

स्वच्छ भारत मिशन हा कार्यक्रम राज्यभर राबवला जात आहे. राज्य आणि केंद्र यासाठी आर्थिक हातभार लावत आहे. शहरी भागासाठी नगरविकास विभाग या कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असून, यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा यांच्या वतीने हागणदारीमुक्‍त शहर हा उपक्रम नगरविकास राबवत आहे. यासाठी समुदाय शौचालये, वैयक्‍तिक लाभार्थी शौचालये बांधण्याचे काम 2015 पासून सुरू आहे. राज्य सरकारने शहरी, तसेच ग्रामीण भाग हागणदारीमुक्‍त झाल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर नगरविकास विभागाने शहरी भागातील वैयक्‍तिक लाभार्थी हे आधारशी जोडण्याचे काम सुरू केले आहे. वैयक्‍तिक लाभार्थ्यांला 12 हजार रुपये इतके अनुदान दिले जाते. राज्याच्या शहरी भागात सुमारे सात लाखांच्या आसपास वैयक्‍तिक लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. या सर्वांना आधार कार्डशी जोडण्याचे काम सुरू आहे.

आधार जोडणीचे फायदे
- थेट लाभार्थ्यांना अनुदान, गैरप्रकार नाही.
- स्वच्छता दूत म्हणून भविष्यात मदत.
- प्रशासकीय यंत्रणेकडून पाठपुरावा करणे सोपे
आकडेवारी
- शहरातील वैयक्‍तिक लाभार्थी : 7 लाख 1 हजार 364
- आधार लिंक होऊ शकणारे लाभार्थी- 5 लाख 33 हजार 469
- आधार जोडणी झालेले लाभार्थी- 2 लाख 70 हजार 80
- जोडणी न झालेले लाभार्थी- 2 लाख 63 हजार 388
- आधार कार्ड नसणारे लाभार्थी- 1 लाख 67 हजार 895

Web Title: toilet Beneficiary aadhar card linking