'टोल'धाड : नाक्यावरील मुजोरी..!

संतोष धायबर
मंगळवार, 24 जानेवारी 2017

काही प्रश्न :
1) मोटारीत पत्रकार नसते तर या प्रकरणाचे पुढे काय झाले असते?
2) पत्रकारांनाच सवलत का? (आम्ही पत्रकार असल्याचे सांगितलेच नव्हते.)
3) टोलबाबतचे नियम सर्वांना समान नकोत का?
4) टोल नाक्यावर नियमांचा फलक नको का?
5) टोल नाक्यावरील कर्मचाऱयांना वाहन चालकांशी कसे बोलावे? याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे का?

आतापर्यंत देशभरातील विविध महामार्गांवर टोलनाके सुरू करण्यात आले असून, सरकार प्रवाशांची विशेष 'काळजी' घेत असल्याचे दिसून येत आहे. महामार्गावरून प्रवास करताना तो सुखकर व्हावा म्हणून चांगल्या रस्त्यांची आवश्यकता असून टोल भरणे हे आपले काम आहे. पण, त्याचबरोबर टोलनाक्यावरील कर्मचाऱयांना विशेष प्रशिक्षणाचीही गरज आहे, हे सुद्धा जाणवू लागले आहे.

कोल्हापुर-पुणे महार्गावरील खेड-शिवापूर येथील टोलनाका. वेळ रात्री अकराची... मोटार टोलच्या खिडकीपाशी येऊन थांबली. मोटार चालविणार मित्र स्थानिक असल्यामुळे त्याने वाहन परवाना दाखविला. टोलधारकाने त्याच्यावरून नजर फिरवून तो संगणकापुढे टाकला अन् टोलचे पैसे देण्याची मागणी केली. मित्राने स्थानिक असल्याचे सांगून या महामार्गावरून अनेकदा प्रवास केला आहे. शिवाय, प्रत्येकवेळी वाहन परवाना दाखविल्यानंतर वाहन सोडण्यात येत असल्याचेही सांगताच त्याचा पारा चढला. जास्त काही बोलू नका.... पैसे दिले तरच वाहन सोडले जाईल... मित्र पुढे सांगण्याचा प्रयत्न करू लागला.... परंतु, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तुम्ही स्वतःला समजता कोण? पन्नास लाखांची गाडी वापरता अन् ऐंशी रुपये देता येत नाहीत का? वैगेरे वैगेरे....

तुम्ही कोणालाही बोलवा अथवा कुठेही जा... आम्ही कोणाला घाबरत नाही... काय करायचे ते करा... टोल वरील कर्मचाऱयाची वरील वाक्य ऐकल्यानंतर मोटारीत बसलेलो आम्ही पाच जण थक्कच झालो. सर्वांनी मिळून त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हता. आमच्यापेक्षा लहान असूनही आम्ही त्याला आदराने बोलत होतो. तो मात्र एकेरी व अर्वाच्च भाषेत बोलत होता. अखेर, आम्ही मोटार बंद करून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. खाली उतरल्यानंतर त्याने आमच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न सोडला नाही. त्याने त्याच्या इनचार्जला बोलवले. वरिष्ठ अधिकाऱयाची भाषा तर अधिकच 'कडक' होती. आम्ही स्थानिक आहोत. तुमच्यासारखे अनेकजण पाहिले आहेत. उगाच आमच्या नादी लागू नका. पैसे भरा अन् चला पुढे...

मित्राने नियमांवर बोट ठेवले होते. दोन वेळेचे पैसे देतो, पण सर्वांना नियम सारखे नकोत का? तुमच्या मनात येईल तसे तुम्ही नियम फिरवता का? नियम दाखवा पैसे देतो...
पैसे दिल्याशिवाय गाडी सोडणार नाही... क्रेन मागवून गाडी उचलून नेतो... तुमच्यावर पोलिसांकडे गुन्हा दाखल करतो, असे टोल नाक्यावरील वरिष्ठ अधिकारी बोलू लागला.

शब्दाने शब्द वाढत चालले होते. प्रकरण हाताबाहेर चालल्यामुळे आम्ही पोलिसांशी संपर्क साधला. काही वेळातच सायरन वाजत पोलिसांची गाडी घटनास्थळी दाखल झाली. गाडीतून साध्या वेशातील पोलिस खाली उतरला. तोंडामध्ये गुटखा होताच. टोलवरील अधिकारी पोलिसांच्या दिशेने पुढे गेला. बहुदा दोघांची पुर्वीपासून ओळख असणारच.... यामुळे तो उतरल्या उतरल्या आमच्याशी गुन्हेगार असल्याप्रमाणे बोलू लागला. आम्ही सर्वांनी मिळून नियमावर बोट ठेवलेले. पोलिसाने 'अपेक्षे'प्रमाणे टोलचालकाचीच बाजू घेतली. यामुळे प्रकरण काही पुढे हालेना. वेळ पुढे-पुढे जात होती. अखेर आम्ही वरिष्ठ पोलिस अधिकाऱयांशी चर्चा करण्याचे ठरविले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱयांशी मोबाईलवरून चर्चा झाली. प्रकरण वरपर्यंत पोचले. काही वेळातच वरिष्ठांचा दूरध्वनी त्या पोलिसाला आला. दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर पोलिसाची एकदम भाषाच बदलली. तुम्ही सर्वजण पत्रकार असल्याचे अगोदरच सांगितले असते तर कधीच सोडले असते. पोलिसाच्या बोलण्यातून आम्ही सर्वजण पत्रकार असल्याचे शब्द बाहेर पडल्यानंतर टोलनाक्यावरील अधिकाऱयाची धमकीची भाषाही एकदम बदलली.

पत्रकारांची गाडी असल्याचे अगदोरच सांगितले असते तर एवढा कशाला वेळ गेला असता. तुमची मोटार कधीच सोडून दिली असती, असे टोलनाक्यावरील कर्मचारी बोलू लागला. पोलिस व टोलनाक्यावरील कर्मचाऱयाने मोटार पैसे न घेता सोडून देण्याचा निर्णय घेतला खरा. परंतु, यामधून काही प्रश्न उपस्थित झाले....

1) मोटारीत पत्रकार नसते तर या प्रकरणाचे पुढे काय झाले असते?
2) पत्रकारांनाच सवलत का? (आम्ही पत्रकार असल्याचे सांगितलेच नव्हते.)
3) टोलबाबतचे नियम सर्वांना समान नकोत का?
4) टोल नाक्यावर नियमांचा फलक नको का?
5) टोल नाक्यावरील कर्मचाऱयांना वाहन चालकांशी कसे बोलावे? याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे का?

आमची मोटार टोल नाक्यावरून सोडून देण्यात आली. पत्रकार असल्यामुळे वरिष्ठ स्तरातून अनेकांचे दुरध्वनी सुरू झाले. प्रकरण मिटविण्याचा सल्लाही देण्यात आला. दुसऱया दिवशी दैनिकामध्ये बातमीही छापून आली. पुढे त्याचा 'फोलोअप'ही आला. परंतु, आमच्या जागेवर सर्वसामान्य नागरिक असता तर त्याचे काय झाले असते? किंवा दररोज असे प्रकार होतही असतील. परंतु, उगाच कटकट नको म्हणून अनेकजण कानाडोळा करून पुढे निघून जात असतील. पण, यामुळे टोलनाक्यावरील मुजोरी वाढत चालली आहे का? हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनाही पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से टोलनाक्यावर त्याच दिवशी असाच एक अनुभव आला. संबंधित व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला असून, अनेक नेटिझन्सनी टोलनाक्यावरील अनुभवांविरोधात प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. खरंतर प्रवासादरम्यान प्रत्येकाला चांगले-वाईट अनुभव येत असणारच. सुखकर प्रवास करायचा असेल तर रस्ता चांगला असावा, ही प्रत्येकाची माफक अपेक्षा. प्रत्येकाने टोलही द्यायलाही हवा. परंतु, टोलनाक्यावरील कर्मचाऱयांना विशेष प्रशिक्षण द्यायला हवे. वाहनातून प्रवास करणारे हे गुन्हेगार नव्हे तर ग्राहक आहेत, या दृष्टीकोनातून पहायला हवे. खासगीकरणातील विविध क्षेत्रांमध्ये ग्राहकांची आपुलकीने काळजी घेतली जाते. मात्र, याठिकाणी दुय्यम दर्जाची वागणूक का दिली जाते? यामागे नेमके काय कारण असावे? याचा शोध घेणे जरुरीचे ठरेल.

Web Title: Toll naka: blog by santosh dhaybar