टुलकिट प्रकरण: शंतनू मुळूक याचा जामीन औरंगाबाद खंडपीठाने केला मंजूर

टीम ई सकाळ
Tuesday, 16 February 2021

दिल्ली येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनाशी संबंध असलेल्या टूलकीट प्रकरणाचे बीड कनेक्शन समोर आले आहे.

औरंगाबाद : शंतनू शिवलाल मुळूक (रा.बीड) यांच्या विरोधात अजामीनपात्र वाॅरंट काढण्यात आले आहे. दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करेपर्यंत अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळविण्यासाठी शंतनू मुळूक याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अडॅ.सतेज पाटील यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. या अर्जावर आज मंगळवारी (ता16) सुनावणी झाली. यात खंडपीठाने शंतनू मुळूक यांना दहा दिवसांचा जामीन मंजूर केला आहे.

यामुळे त्यांना दिल्लीत जाऊन कायदेशीर बचाव करता येणार आहे. त्यांना संविधानाने दिलेल्या घटनात्मक हक्कांच्या आधारावर जामीन मंजूर केल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.

बीड कनेक्शन
दिल्ली येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनाशी संबंध असलेल्या टूलकीट प्रकरणाचे बीड कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणातील संशयित शंतनू शिवलाल मुळूक याच्या चाणक्यपुरीतील घराची नुकतीच दिल्ली पोलिसांनी झडती घेतली. त्याच्या नातेवाईकांची चौकशी केली. बीडचे पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनीही यास दुजोरा दिला. टुलकिट प्रकरणी शंतनू मुळूक याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. त्याच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांचे पथक नुकतेच बीडमध्ये येऊन गेले.   

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Toolkit Case Aurangabad High Court Bench Grants Transit Bail to Shantanu Muluk Aurangabad News