esakal | कोकणात मुसळधार; मराठवाड्यात तुरळक पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणात मुसळधार

कोकणात मुसळधार; मराठवाड्यात तुरळक पाऊस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोकण आणि मध्य महाराष्ट्रात शुक्रवार (ता. ३०) पर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार, तर मराठवाड्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. राज्याच्या कोकण किनारपट्टीवर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आठवडाभर तरी राज्यात पावसाच्या सरी कोसळतील. मात्र, मराठवाड्यात तुलनेने कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

कोकण, गोवा आणि विदर्भात बुधवारी बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांत उघडीप दिली आहे. मराठवाड्यात ऊन पडत असल्याने शेतातील पाणीपातळी ओसरली आहे. विदर्भात अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी तुरळक ठिकाणी शिडकावा होत आहे.

हेही वाचा: पुणे-नाशिक रेल्वेसाठी जमिनीची मोजणी सुरू

पुण्यात हलक्या पावसाची शक्यता
पुणे शहर आणि परिसरात महिना अखेरपर्यंत दिवसभर आकाश अंशतः ढगाळ आणि दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र दिवसभर ऊन-पावसाचा लपंडाव सुरू आहे. हलक्या सरी कमी अवधीसाठी पडत असल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे. पुढील काही दिवस तरी बाहेर पडताना रेनकोट किंवा छत्री बाळगणे गरजेचे आहे. शहरात बुधवारी दिवसभर सरासरी अर्धा मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

loading image
go to top