मनोऱ्यांच्या जागेच्या मोबदल्यात दुप्पट नुकसानभरपाई

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 मे 2017

मुंबई - राज्यातील 66 के.व्ही. ते 1200 के.व्ही. पारेषण वाहिन्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या मनोऱ्यासाठी लागणाऱ्या जागेच्या मोबदल्यात वाढ करून ती जमिनीच्या मूल्याच्या दुप्पट करण्यात आली आहे. तसेच अशा प्रकारच्या पारेषण वाहिनीच्या तारेखालील जमिनीचा मोबदला देण्याचा प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. केंद्राच्या सूचनेनुसार मनोरा व्याप्त जमिनीचा मोबदला हा जमिनीच्या मूल्याच्या 85 टक्के इतक्‍या प्रमाणात प्रदान करण्याच्या तर पारेषण वाहिनीच्या तारांखालील जमिनीच्या मूल्याच्या 15 टक्के इतक्‍या प्रमाणात भरपाई देण्यात येते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक भरपाई मिळावी यासाठी केंद्राच्या सूत्रात वाढ करण्यात आली. त्यानुसार मनोऱ्याने व्यापलेल्या जमिनीच्या रेडीरेकनरप्रमाणे निश्‍चित मूल्याच्या दुप्पट भरपाई देण्यात येणार आहे. वाहिनीच्या तारेखालील जमिनीच्या भरपाईच्या बाबतीत केंद्राप्रमाणेच 15 टक्के इतक्‍या प्रमाणात भरपाई दिली जाईल. फळझाडे, पिके व इतर झाडांच्या भरपाईच्या बाबतीत सध्या प्रचलित असलेल्या धोरणाप्रमाणे भरपाई दिली जाईल.

इतर निर्णय
- आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमास 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ. यासाठीच्या 40 पदांनाही मुदतवाढ
- घोडागाडी चालक - मालकांच्या पुनर्वसन योजनेस मान्यता
- अटल सौर कृषी पंप योजनेंतर्गत 2460 सौर कृषी पंपांची उभारणी करण्यास मान्यता
- मेंढी पालनासाठी महामेष योजना, त्यासाठी 6 कोटी 27 लाख रुपये मंजूर

Web Title: tower place double compensation