वाहतूक नियम तोडल्यास परवाना रद्द 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

मुंबई - वाहतूक नियमनात ई-चलन प्रणाली अस्तित्वात आल्याने वाहतूक नियमांचे वीस वेळा उल्लंघन केल्यास चालकाचा वाहन परवाना कायमचा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी शुक्रवारी दिली. 

मुंबई - वाहतूक नियमनात ई-चलन प्रणाली अस्तित्वात आल्याने वाहतूक नियमांचे वीस वेळा उल्लंघन केल्यास चालकाचा वाहन परवाना कायमचा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी शुक्रवारी दिली. 

राज्याच्या गृह विभागात अमूलाग्र बदल करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. उर्वरित 24 महापालिका क्षेत्रातही ही यंत्रणा बसविण्यासाठी सल्लगार कंपनीची नियुक्‍ती केली असून, हे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार असून, गुन्ह्यांची उकलही कमी वेळेत होईल, असा विश्वास बक्षी यांनी व्यक्‍त केला. 

राज्यातील वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असते. या वेळी दंड भरताना किंवा कारवाई करताना वाहनचालक आणि पोलिसांदरम्यान भांडणाचे प्रसंग ओढवतात, परिणामी वाहतूक विस्कळित होते. यासाठी ई-चलन व्यवस्था कार्यान्वित केली आहे. वाहनचालकाने नियम तोडल्यास त्याला ई-चलनाची नोटीस जागेवरच देता येईल किंवा घरच्या पत्त्यावर जाईल, दंडाची रक्‍कम त्याला संगणकाद्वारे भरता येईल. या यंत्रणेमुळे वाहनचालकाने किती वेळा नियम तोडला त्याचा तपशील उपलब्ध असेल. दहा वेळा नियम तोडल्यास दोन महिन्यांसाठी, तर वीस वेळा नियम तोडल्यास कायमस्वरूपी चालक परवाना रद्द करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

गृह विभागात होणारे अन्य बदल 

पोलिस भरतीसाठी संगणकाद्वारे वजन, उंची व धावण्याच्या चाचण्या 

आग, आरोग्य, पोलिस मदतीसाठी देशभरात एकच 112 टोल फ्री क्रमांक 

पोलिसांसाठी आवश्‍यक असणाऱ्या वस्तूंची खरेदी, उपलब्धता याचा तपशील स्वतंत्र ऍपवर 

पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबतचा तपशील ऍपवर असेल, त्यामुळे कोणत्या कर्मचाऱ्याला कोणते आजार आहेत, त्यानुसार कामाची जबाबदारी देण्यात येईल

Web Title: Traffic rules breaks the license canceled