महामार्गांवरील प्रवास जीवघेणा

तात्या लांडगे  
मंगळवार, 30 जुलै 2019

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५५ ‘ब्लॅकस्पॉट’ची भर पडली आहे. त्यामध्ये सर्वाधिक नाशिक जिल्ह्यात १४७ ‘ब्लॅकस्पॉट’ असल्याचे समोर आले आहे. 

सोलापूर - जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकाऱ्यांची रस्ता सुरक्षा समिती कार्यरत असतानाही मागील तीन वर्षांत राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील ना अपघात ना ‘ब्लॅकस्पॉट’ (अपघातप्रवण ठिकाणे) कमी झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५५ ‘ब्लॅकस्पॉट’ची भर पडली आहे. त्यामध्ये सर्वाधिक नाशिक जिल्ह्यात १४७ ‘ब्लॅकस्पॉट’ असल्याचे समोर आले आहे. 

राष्ट्रीय महामार्ग पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात दरवर्षी सरासरी ३२ हजार अपघातात १२ हजार जणांचा मृत्यू होतो. जानेवारी ते जून २०१९ पर्यंत १६ हजार अपघातांत सहा हजार १९३ लोकांचा मृत्यू झाल्याचेही महामार्ग पोलिसांनी सांगितले. 

या वर्षी अमरावती व औरंगाबाद शहर-जिल्ह्यात प्रत्येकी चार, नाशिक शहर-जिल्ह्यात तब्बल १७, धुळ्यात पाच, सोलापूर जिल्ह्यात सात, सातारा व नांदेडमध्ये प्रत्येकी तीन, रायगडमध्ये दोन; तर नागपूर शहरासह पिंपरी-चिंचवड, भंडारा, कोल्हापूर, पालघर, पुणे, सांगली, वर्धा, वाशीम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक ‘ब्लॅकस्पॉट’ वाढल्याची नोंद महामार्ग पोलिसांत झाली आहे.

उद्दिष्टपूर्तीसाठीच कारवाई 
राज्यात २०१८ मध्ये एक हजार ३२४ ‘ब्लॅकस्पॉट’ होते, तर आता ती संख्या एक हजार ३७९ वर पोचली आहे. दरम्यान, अपघात रोखण्याच्या उद्देशाने नव्हे, तर बहुतेकवेळा उद्दिष्टपूर्तीसाठी कारवाईची मोहीम प्रादेशिक परिवहन विभाग अथवा वाहतूक पोलिसांकडून राबविली जाते. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संबंधित यंत्रणेची भीतीच राहिली नसल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचेही चित्र पाहायला मिळते.

सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय रस्ते विकास महामार्ग महामंडळासह अन्य विभागांनी अपघातप्रवण ठिकाणी गतिरोधक केले. मात्र, उर्वरित उपाययोजना करणे बाकी आहेत. हेल्मेट वापरण्याचे वारंवार आवाहन करूनही दुचाकीस्वार हेल्मेट घालत नसल्याने अपघातातील मृत्यांच्या संख्येत वाढ होते. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून, दीड वर्षात दोन हजार ९०० वाहनचालकांचे परवानेही निलंबित केले आहेत.
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traveling on the highways is life-threatening