सहकार क्षेत्रातील कृतिशील नेता हरपला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

मुंबई : ज्येष्ठ कॉंग्रेस नेते, माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधनाने कृषी, सहकार, शिक्षण या क्षेत्रात भरीव काम करणारा एक कृतिशील नेता हरपला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनीही सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणारे व्यक्तिमत्त्व अशी बाळासाहेबांची ओळख होती. बाळासाहेब विखे पाटील यांचे वडील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातील पहिल्या सहकारी प्रवरा कारखान्याची स्थापना केली होती. आपल्या वडिलांचा सहकाराचा वारसा बाळासाहेबांनी समर्थपणे पुढे नेला. ग्रामीण अर्थकारणाच्या सक्षमीकरणासाठी आणि ग्रामीण जनतेला प्रगतीचे नवनवे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असत. ग्रामीण जनतेचा विकास साधायचा असेल तर कृषी क्षेत्राला बळकटी द्यायला हवी, ही भूमिका त्यांनी सातत्याने मांडली, असे पवार म्हणाले. विखे-पाटील यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी व माझे कुटुंबीय सहभागी आहोत, असेही ते म्हणाले.

बाळासाहेब विखे-पाटील यांच्या निधनाने कृषी, सहकार, ग्रामविकास, शिक्षण, आर्थिक आदी क्षेत्रांत दिशादर्शक कामगिरी करणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राने गमावले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे, की थोर सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे-पाटील यांचा वारसा समर्थपणे चालवताना बाळासाहेबांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून परिपूर्ण ग्रामविकासाचे एक आदर्श मॉडेल सादर केले होते. ग्रामीण भागाच्या परिवर्तनाची नस जाणणाऱ्या मोजक्‍या नेत्यांमध्ये बाळासाहेब अग्रभागी होते. प्रवरा ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण आणि वैद्यक क्षेत्रातही त्यांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून मोठे काम उभे केले.

बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधनाने सहकार, शिक्षण, कृषी, ग्रामविकाससह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणारे एक ज्येष्ठ नेतृत्व हरपले, अशा शब्दांत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

Web Title: tribute to balasaheb vikhe patil