चौकशी करण्याचा सरकारला विसर 

प्रशांत बारसिंग
शुक्रवार, 19 मे 2017

मुंबई - राज्यातील तूर खरेदीच्या प्रक्रियेमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना खरेदीप्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यास राज्य सरकारच विसरले असल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. 

मुंबई - राज्यातील तूर खरेदीच्या प्रक्रियेमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना खरेदीप्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यास राज्य सरकारच विसरले असल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. 

राज्यात यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्यानंतर तूर खरेदीत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना फसविल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्या आहेत. केंद्र सरकारने तुरीचा "एफआरपी' दर 5 हजार 50 रुपये प्रतिक्‍विंटल जाहीर केला होता. मात्र 15 डिसेंबर 2016 ते 22 एप्रिल 2017 या कालावधीदरम्यान बाजार समितीत शेतकऱ्यांची तूर साडेतीन ते चार हजार रुपये प्रतिक्‍विंटल दराने खरेदी करून तीच नंतर राज्य सरकारला 5 हजार 50 रुपये किमतीने विकण्यात आली. वास्तविक पाहता "एपीएमसी'च्या कायद्यानुसार तुरीची लिलाव न करताच ठोक किमतीत तूर खरेदी करून व्यापाऱ्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. यामुळे शेतकरी आणि राज्य सरकार या दोघांना व्यापाऱ्यांनी चांगलाच चुना लावल्याची बाब समोर आली आहे. 

या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याची स्पष्ट कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि व्यापाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात येईल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्‍त केला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला एक महिना उलटला तरी राज्य सरकारला याचा विसर पडल्याचे मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. तूर खरेदीसाठी दोन वेळा मुदतवाढ दिल्यामुळे खरेदीप्रक्रिया सुरू राहिली. याच धांदलीत चौकशीचा आदेश काढण्यात विलंब झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, राज्य सरकारने आतापर्यंत तीन टप्प्यांत पाच लाख 470 क्‍विंटल तूर खरेदी केली असली, तरी शेतकऱ्यांकडे किमान 10 लाख क्‍विंटल तूर शिल्लक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

तीन टप्प्यांतील तूर खरेदी - 15 डिसेंबर 2016 ते 22 एप्रिल 2017 

राज्य संस्था केंद्रीय संस्था खरेदी केंद्रे एकूण खरेदी क्‍विंटलमध्ये 
पणन महासंघ नाफेड/एफसीआय 129 27,86,355 
विदर्भ पणन नाफेड/एफसीआय 43 10,12,798 
महाएफपीसी एसएफएसी 55 3,32,491 
आदिवासी विकास नाफेड 5 20,247 
एकूण ---- --- 41,51,892 

27/4/2017 ते 8/5/2017 

राज्य संस्था खरेदी केंद्रे एकूण खरेदी क्‍विंटलमध्ये 
पणन महासंघ 87 3,22,878 
विदर्भ पणन 27 1,47,538 
आदिवासी विकास 2 3,329 
एकूण -- 4,73,746 

9/5/2017 ते 17/5/2017 
राज्य संस्था खरेदी केंद्रे एकूण खरेदी क्‍विंटलमध्ये 
पणन महासंघ 106 2,85,320 
विदर्भ पणन 27 84,903 
आदिवासी विकास 2 4,607 
एकूण --- 3,74,832 

Web Title: Tur purchase fraud case