esakal | काका-पुतण्यात 'ट्‌विट वॉर'; अजित पवारांचे म्हणणे शरद पवारांनी खोडले
sakal

बोलून बातमी शोधा

Twitter War in Sharad Pawar and Ajit Pawar

राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपसोबत आघाडी करण्याचा प्रश्‍नच नाही. कॉंग्रेस आणि शिवसेनेसोबत आघाडी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता. अजित पवार यांचे वक्‍तव्य खोटे आणि दिशाभूल करणारे असून, जनतेमध्ये गोंधळ आणि चुकीचा समज निर्माण करणारे आहे,' असे थेट ट्‌विट करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांचे वक्‍तव्य खोडून काढले. 

काका-पुतण्यात 'ट्‌विट वॉर'; अजित पवारांचे म्हणणे शरद पवारांनी खोडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : "राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपसोबत आघाडी करण्याचा प्रश्‍नच नाही. कॉंग्रेस आणि शिवसेनेसोबत आघाडी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता. अजित पवार यांचे वक्‍तव्य खोटे आणि दिशाभूल करणारे असून, जनतेमध्ये गोंधळ आणि चुकीचा समज निर्माण करणारे आहे,' असे थेट ट्‌विट करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांचे वक्‍तव्य खोडून काढले. 

शहरात लागले दादा, साहेबांच्या समर्थनार्थ बॅनर

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये, आमदारांमध्ये आणि महाविकास आघाडीतील शिवसेना व कॉंग्रेसमध्येही अजित पवार यांनी केलेल्या वक्‍तव्याने नाराजीचा सूर लागू नये आणि संशयाचे वातावरण निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेण्यासाठी शरद पवार यांनी अजित पवार यांनी केलेल्या ट्‌विटवर अर्ध्या तासाच्या आत प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली. गेल्या दोन दिवसांत राजकीय उलथापालथ झपाट्याने आणि धक्‍कादायक पद्धतीने होत असतानाच भाजपला साथ देत उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवार यांनी केलेल्या ट्‌विटमुळे काही काळासाठी आणखी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच अधिकृतरीत्या भाजप सरकारला पाठिंबा दिला असल्याचा समज अजित पवार यांनी केलेल्या ट्‌विटमुळे निर्माण झाला होता. मात्र, शरद पवार यांनी ट्‌विटरवरूनच प्रत्युत्तर देत अजित पवार हे खोटे बोलत असल्याचे सांगत कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

"राष्ट्रवादी'मधून बंडाळी केल्यानंतर अजित पवार यांनी कालपासून मौन धारण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अजित पवार यांना ट्‌विटरवरून दिलेल्या शुभेच्छांना अजित पवार यांनी आज धन्यवाद मानल्यानंतर त्यांच्यावर भाजपच्या केंद्रीय मंत्री आणि नेत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना ट्‌विटरवरून संबोधत "मी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच असून, कायम शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच असणार आहे. आपले भाजप आणि राष्ट्रवादीचे आघाडीचे सरकार पुढील पाच वर्षे महाराष्ट्राला स्थिर सरकार देईल,' असे सांगितले. यामुळे एकच संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे अर्ध्या तासाच्या आत शरद पवार यांनी अजित पवार यांनी केलेल्या वक्‍तव्याशी आणि भाजपशी काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले. 

विश्वासघात करणाऱ्यांसोबत लढणाऱ्या शरद पवारांचा मला अभिमान - सुप्रिया सुळे

सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडीकडे बहुमत असून, तिन्ही पक्षांच्या आमदारांनी काळजी करू नये. शरद पवार सोबतीला आहेत. त्यामुळे आमदारांनी कुठलीही शंका बाळगू नये. - उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख 

मी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच कायम आहे. मला उभे आडवे चिरले तरी शरीर राष्ट्रवादीतच असेल. भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थिर सरकार असेल. कुणीही घाबरण्याचे कारण नाही. थोडा संयम ठेवण्याची आवश्‍यकता आहे. - अजित पवार, उपमुख्यमंत्री

अजित पवार यांचे विधान दिशाभूल करणारे आहे. ते संभ्रम निर्माण करत आहेत. आम्ही भाजपसोबत जाण्याचा प्रश्‍नच नाही. सरकारचे नेतृत्व शिवसेना करणार असल्याचे तिन्ही पक्षांत ठरले आहे. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस