कुर्डुवाडीतून अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त! वेषांतर करून पोलिसांनी दोघांना केली अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 बनावट नोटा
कुर्डुवाडीतून अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त! वेषांतर करून पोलिसांनी दोघांना केली अटक

कुर्डुवाडीतून अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त! वेषांतर करून पोलिसांनी दोघांना केली अटक

कुर्डुवाडी : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कुर्डुवाडीत छापा टाकून अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या आहेत. पोलिसांनी वेशांतर करुन सिनेस्टाईलने दोघांना जेरबंद केले. ही कारवाई शनिवारी (ता ३) रोजी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. बनावट नोटा कुठे कुठे गेल्या असून त्याचा मास्टरमाईंड कोण, याचा शोध पोलिस घेत आहेत.

ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा छापा टाकला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षल शिवाजी लोकरे (वय २०, रा. कंदर, ता. माढा), सुभाष दिगंबर काळे (वय ३६, रा. भोसरे, ता. माढा) या दोघांना अटक करण्यात आली असून कुर्डुवाडी पोलिसांत त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. तत्पूर्वी, खबऱ्याकडून मिळालेल्या गोपनिय माहितीद्वारे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव व गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पोरे यांच्या पथकाने कुर्डुवाडी- टेंभुर्णी रस्त्यावर व चौकात दोन सापळे रचले. त्यावेळी पोलिसांनी वेगवेगळे वेषांतर केलेले होते. काहीवेळाने हर्षल लोकरे हा बनावट नोटांची बॅग घेऊन दुचाकीवरून बालोद्यान चौकात आला होता. पोलिसांनी त्याला बनावट नोटांसह ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर सुभाष काळे याच्याकडून नोटा आणल्याचे सांगितले. पोलिसांनी सुभाषला कुर्डुवाडीपासून १५ किलोमीटर अंतरावरून पकडले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक पोरे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, नीलकंठ जाधवर, श्रीकांत गायकवाड, बिराजी पारेकर, सर्जेराव बोबडे, आबासाहेब मुंढे, विजय भरले, सलीम बागवान, हरिदास पांढरे, रवी माने, विनायक घोरपडे, चालक दिलीप थोरात या पथकाने केली.

हुबेहुब ‘वॉटरमार्क’च्या पाचशेच्या नोटा

पोलिसांनी हर्षल लोकरे याच्याकडून जप्त केलेल्या सर्व बनावट नोटा पाचशे रुपयांच्या आहेत. त्यामध्ये वॉटरमार्क हुबेहुब आहे. परंतु, त्या थोड्या पातळ असून त्यामध्ये काही नोटांचे नंबर सारखे देखील आहेत. बनावट नोटा जप्त केल्या असून त्याचा मुख्य सूत्रधार कोण, याचा कसून तपास सुरु आहे. तसेच किती दिवसांपासून या नोटा तयार केल्या जात आहेत, त्या कुठे कुठे खपवल्या आहेत, याचीही माहिती पोलिस घेत आहेत.

‘बी-कॉम’चे शिक्षण घेतोय हर्षल

बनावट नोटाप्रकरणी हर्षल लोकरे व सुभाष काळे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना उद्या (रविवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. संशयित आरोपी असलेला हर्षल हा ‘बी-कॉम’च्या द्वितीय वर्षात शिकत आहे. तर सुभाष काळे हा पुण्यात रिक्षा चालवत होता. काही महिन्यांपूर्वी तो गावी आला होता. पोलिसांना बनावट नोटा छपाईची मशीन मिळालेली नाही. मशीन कुठे आहे, याचाही शोध सुरु आहे.