लॉकडाउनने खाल्ल्या नोकऱ्या ! "या' पोर्टलवर अडीच लाख बेरोजगारांच्या उड्या 

Unemloyment
Unemloyment

सोलापूर : कोरोना विषाणूने अनेकांचे आरोग्य बिघडवले तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे लाखो कामगारांच्या नोकऱ्या गेल्यामुळे बेरोजगारीची आपत्तीही आली. तर दुसरीकडे अनेक उद्योग-व्यवसायातील परप्रांतीय कामगार आपल्या प्रांतांकडे परतल्याने व कोरोनाच्या भीतीमुळे कामावर न येणाऱ्या कामगारांमुळे उद्योजकांना कामगारांची तुटवडा जाणवत आहे. असा हा विचित्र प्रसंग राज्यावर ओढावल्यामुळे कामगार व उद्योजकांमध्ये द्विधा मन:स्थिती निर्माण झाली आहे. बेरोजगारी कमी करणे व उद्योजकांना कामगार पुरवणे या उद्देशाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) सुरू केलेल्या "महाजॉब्स' पोर्टलवर रोजगारासाठी नोंदणी केलेल्या कामगारांच्या नजरा आता या पोर्टलकडे लागल्या आहेत. 

दोन हजार उद्योजक व अडीच लाख बेरोजगारांनी केली नोंदणी 
राज्यातील उद्योजकांना मनुष्यबळ उपलब्ध व्हावे व युवकांना रोजगार मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या उद्योग खात्याकडून 6 जुलै रोजी एमआयडीसीच्या माध्यमातून "महाजॉब्स' हे पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. या पोर्टलवर उद्योगांना व रोजगार मिळवू पाहणाऱ्या युवकांना नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उद्योजकांनी कुशल, अर्धकुशल किंवा अकुशल कामगारांची मागणी नोंदणी केल्यानंतर पोर्टलवरील मागणीच्या अनुषंगाने व पात्रतेनुसार यादी उपलब्ध करून देण्यात येते. त्यामधून उद्योजकांना आवश्‍यक कामगारांची निवड करता येईल. हे पोर्टल कार्यान्वित झाल्यापासून आतापर्यंत दोन हजार 176 उद्योजकांनी व दोन लाख 64 हजार 555 इच्छुक उमेदवारांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे. 

जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूरचे महाव्यवस्थापक बाळासाहेब यशवंते यांनी बेरोजगार व उद्योजकांना आवाहन केले आहे, की ज्या बेरोजगारांना कारखान्यांमध्ये रोजगार हवा आहे, अशा अशांनी या पोर्टलवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावयाची आहे. त्यात काम कशा पद्धतीचे हवे आहे, याचाही उल्लेख करण्यासाठी रकाना दिला आहे. तो भरून द्यायचा आहे. 
उद्योजकांना त्यांच्या उद्योगात रिक्त पदांवर कामगार हवे आहेत याबाबत या पोर्टलवर माहिती भरावयाची आहे. यामुळे कुठेतरी जाहिरात द्यायची, मग इच्छुक अर्ज देणार व नंतर इतर कागदपत्रे जमा करणार, मुलाखतीला जाणार, परीक्षा देणार हा सर्व खटाटोप या पोर्टलमुळे बंद होणार आहे. उद्योजकांना कशा पद्धतीचे कामगार हवे आहेत, त्याची माहिती या पोर्टलवर भरल्यानंतर रोजगाराच्या शोधात असलेल्या कामगारांना आपण या पदावर योग्य असल्यास लगेच तो ऑनलाइन माहिती सादर केल्यावर त्याची निवडही ऑनलाइन कळवण्यात येणार आहे. 

किती जणांना रोजगार मिळाला याची नाही माहिती 
श्री. यशवंते म्हणाले, किती उद्योजकांना किती कामगार उपलब्ध झाले व किती बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या याची माहिती अद्याप समजू शकली नाही. यापुढे शासन प्रत्येक जिल्हा उद्योग केंद्राला या पोर्टलचा ऍक्‍सेस, यूजर आयडी व पासवर्ड देणार आहे. त्यानंतर जिल्हानिहाय नोकऱ्या किती जणांना मिळाल्या, किती उद्योजकांना किती कामगार उपलब्ध झाले याची माहिती मिळणार आहे. हे पोर्टल उद्योजक व कुशल-अकुशल कामगारांमधील दुवा म्हणून काम करीत आहे. जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी या पोर्टलवर नोंदणी करून मनुष्यबळाच्या आवश्‍यकतेसाठी पोर्टलचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com