खड्ड्यातील पाण्यात बुडून जेजुरीत दोन मुलांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

खड्ड्यांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यात बुडून दोन शालेय मुलांचा मृत्यू झाला.

वाल्हे - जेजुरी (ता. पुरंदर) नजीक जुन्या जेजुरी येथील पेशवेकालीन तलावातील अवैध उत्खननातून निर्माण झालेल्या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यात बुडून दोन शालेय मुलांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. आदर्श मनोहर उबाळे (वय ७) व आदित्य संभाजी कोळी (वय ९, दोघेही रा. जुनी जेजुरी) अशी मृत मुलांची नावे आहेत.

पावसामुळे तलावातील अनेक खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले आहे. त्यापैकी एका खड्ड्यात ही दोन्ही मुले पोहत होती. पोहताना त्यांना खोलीचा अंदाज न आल्याने ती बुडाली. दुपारपर्यंत मुले घरी आली नाहीत म्हणून नातेवाइकांनी सर्वत्र शोधाशोध केली असता एका खड्ड्याच्या काठावर त्यांचे कपडे आढळून आले. या बाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोहणाऱ्या तरुणांच्या मदतीने खड्ड्यामध्ये उतरून मुलांचे मृतदेह बाहेर काढले. 

या वेळी या खड्ड्यांची खोली अंदाजे पंधरा फुटांपेक्षा जास्त असल्याचे कळले. त्यामुळे सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. दोन्ही मुले आई-वडिलांची एकुलती एक होती. आदर्श हा इयत्ता पहिली, तर आदित्य तिसरीमध्ये शिकत होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two children dead

टॅग्स