कृष्णा नदीत दोघे बुडाले 

कृष्णा नदीत दोघे बुडाले 

सांगली - येथील कृष्णा नदीत माई घाटावर पोहण्यास गेलेले राजकुमार रामचंद्र यादव (वय 40) व महादेव सत्याप्पा माने (वय 35, लक्ष्मीनारायण कॉलनी, डी मार्टमागे, सांगली) यांचा बुडून मृत्यू झाला. आज दुपारी अडीचच्या सुमारास दुर्घटना घडली. आयुष हेल्पलाइन टीमच्या कार्यकर्त्यांनी तीन तासांच्या शोधमोहिमेनंतर यादवचा मृतदेह बाहेर काढला. तर जीवरक्षक टीमच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा माने यांचा मृतदेह बाहेर काढला. 

अधिक माहिती अशी, यादव आणि माने मित्र आहेत. आज रविवारची सुटी असल्याने मित्रांसमवेत ते दुपारी दोनच्या सुमारास कृष्णा नदीवर पोहण्यास गेले. उन्हाच्या तडाख्यामुळे पोहण्यासाठी माई घाटावर गर्दी होती. पात्रात उतरून सर्वजण पोहू लागले. अडीचच्या सुमारास घाटापासून काही अंतरावर पोहताना दम लागल्याने माने बुडू लागले. त्यांनी वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. यादव वाचवण्यासाठी गेले. यादव यांनी पाण्यात बुडून माने यांना पकडले; परंतु घाबरलेल्या माने यांनी यादव यांना मिठी मारल्यामुळे ते बुडाले. काही अंतरावर पोहणाऱ्यांनी दोघांना वाचवण्यासाठी पात्रात उड्या घेतल्या; परंतु तोपर्यंत दोघेही खोलवर बुडाले होते. 

नदीत दोघे बुडाल्याची बातमी सगळीकडे पसरली. शहर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी धावले. आयुष हेल्पलाइन टीमला मदतीसाठी बोलावले. टीमचे अविनाश पवार, अक्षय शितोळे, गणेश आनंदे, अनिकेत मगदूम, शुभम शितोळे, जमीर बोरगावे, निहाल मुजावर, स्वप्नील कांबळे, गजानन नरळे यांनी दुपारपासून पात्रात उड्या घेऊन तळाला शोध घेतला. सायंकाळी सहाच्या सुमारास यादव यांचा मृतदेह सापडला. रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतर जीवरक्षक टीमचे महम्मद तांबोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाण्यातील कॅमेऱ्याच्या साह्याने माने यांच्या मृतदेहाचा शोध घेऊन तो बाहेर काढला. दरम्यान, यादव आणि माने यांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची बातमी दुपारी लक्ष्मीनारायण कॉलनीत समजताच तेथे शोककळा पसरली. नातेवाईक व नागरिकांनी नदीकाठावर धाव घेतली. दोघांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com