मराठा, धनगर आरक्षणासाठी मराठवाड्यात दोन आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

तीर्थपुरी/सेलू : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात एका व्यक्तीने; तर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी परभणी जिल्ह्यात एका युवकाने आत्महत्या केल्याच्या घटना आज उघडकीस आल्या. 

तीर्थपुरी/सेलू : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात एका व्यक्तीने; तर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी परभणी जिल्ह्यात एका युवकाने आत्महत्या केल्याच्या घटना आज उघडकीस आल्या. 

अंतरवाली टेंभी (ता. घनसावंगी, जि. जालना) येथील गणेश तुकाराम नन्नवरे (वय 45) यांनी शेतात विष घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या खिशात मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत चिठ्ठी आढळली. शनिवारी रात्री शेतात गेलेले गणेश नन्नवरे परत न आल्याने त्यांचे बंधू पाराजी नन्नवरे सकाळी शेतात गेले असता, त्यांना गणेश मृतावस्थेत आढळले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करत, 'समाजाचा अंत पाहू नका, आरक्षण देऊन टाका, त्यामुळे पुढची पिढी बरबाद होणार नाही. सरकार आणखी किती बळी घेणार' अशा आशयाची चिठ्ठी गणेश यांच्या खिशात आढळली. मराठा आरक्षणाच्या मोर्चात सहभागी असलेल्या गणेश यांना हुतात्मा जाहीर करून कुटुंबाला पन्नास लाखांची मदत द्यावी, कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे व समाजाला आरक्षण द्यावे, अशा मागण्या सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्या. आमदार राजेश टोपे यांनी नन्नवरे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. दरम्यान, धनगर समाजास अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात शासनस्तरावरून विलंब होत असल्याने गोमेवाकडी (ता. सेलू, जि. परभणी) येथील योगेश राधाकिशन कारके (वय 20) या तरुणाने रविवारी (ता. 12) दुपारी साडेबाराच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 

आत्महत्येपूर्वी योगेशने 'मी धनगर समाजासाठी जीव देत आहे' असा मेसेज मोबाईलद्वारे बी. शिंदे नावाच्या एका व्यक्तीला पाठविण्याचा प्रयत्नही केला. मात्र, यात नेटवर्कचा अडथडा आल्याने वेळेत संदेश पोचू शकला नाही, अशी माहिती सेलू पोलिसांनी दिली. 

Web Title: Two suicides in Marathwada for reservation of Maratha and Dhangar