Barsu Refinery Project : बारसू प्रकल्प जनतेच्या साथीनेच; उदय सामंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uday Samant statement Barsu Refinery Project with public support mumbai

Barsu Refinery Project : बारसू प्रकल्प जनतेच्या साथीनेच; उदय सामंत

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे तेल रिफायनरी (तेल शुद्धीकरण प्रकल्प) उभारण्यापूर्वी येथील स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. बारसू येथे होणाऱ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. यावेळी तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी होणारे भूसंपादन, पाणी पुरवठा आदी मुद्द्यांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. स्थानिक आमदार राजन साळवी यांनी प्रकल्पाला पाठिंबा देत सरकारच्या भूमिकेला समर्थन दिले. या प्रकल्पासाठी एकूण ६२०० एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यापैकी २९०० एकर जमीन संपादित करण्यात आली असून या प्रकल्पामुळे दोन लाख कोटींची थेट गुंतवणूक होणार आहे. यातून सुमारे एक लाख रोजगार निर्माण होणार असल्याचेही सांगितले जात आहे.

‘बारसूमधील सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी, स्थानिकांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला आहे. येथील जनतेच्या मागण्या पूर्ण करण्याचा आमचे सरकार प्रयत्न करेल. प्रकल्पामुळे येथील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. प्रकल्पाबाबत असलेले जनतेचे गैरसमज दूर केले जातील,’ असे सामंत यांनी स्पष्ट केले.

बैठकीतील निर्णय

  • प्रकल्पासाठी कोयना धरणातून पाणी आणण्यास तत्त्वतः मान्यता

  • अर्जुना आणि खोदवली नदीपात्रातील पाच लाख घनमीटर गाळ काढणार

  • बारसू भागात एक सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणार

  • मुंबई गोवा महामार्गालगत एक लाख वृक्ष लावणार, आंबा काजूला प्राधान्य

  • कौशल्य विकास केंद्र सुरू करणार