आतापर्यंत गुजराथी समाजाचा दुरुपयोग - उद्धव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

राहुल गांधी म्हणतात मला संसदेत बोलू दिले जात नाही. मोदी म्हणतात मला बोलू दिले जात नाही. पण, जनता समजूतदार आहे. जनता पाहत आहे कोण काय बोलत आहे.

मुंबई - शिवसेनेबद्दल अनेक वेळा जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले गेले. गुजराथी समाजाने शिवसेनेसोबत आले पाहिजे असे बाळासाहेबांना नेहमी वाटत होते. दुर्देवाने गेल्या काही दिवसांपासून देशात काय चाललंय कुणाला कळलंय की नाही मला माहिती नाही. आजपर्यंत गुजराथी समाजाचा दुरूपयोग केला गेला. शिवसेना तुम्हाला रांगेत उभे करणार नाही. सध्या रांगेत उभे राहणे हा राष्ट्रीय कार्यक्रम झाला आहे, असा खोचक टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (गुरुवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते हेमराज शहा, जयंतीभाई मोदी आणि भाजपचे गुजराथी विभागाचे उपाध्यक्ष राजेश दोशी यांच्यासह अनेक गुजराती समाजाच्या नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी इतर समाजातील नेत्यांना शिवसेनेत प्रवेश करून तयारी सुरू केली आहे. हेमराज शहा हे सुरवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. त्यांच्या सोबत भाजपच्या गुजराथी विभागाचे उपाध्यक्ष राजेश दोशी हेही शिवसेनेत येत असल्यामुळे भाजपला मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले, की राहुल गांधी म्हणतात मला संसदेत बोलू दिले जात नाही. मोदी म्हणतात मला बोलू दिले जात नाही. पण, जनता समजूतदार आहे. जनता पाहत आहे कोण काय बोलत आहे. जिल्हा बँकांमध्ये शेतकऱ्यांचे गरीबांचे पैसे आहेत. या बँकांवर निर्बंध लावून काय मिळवले. विजय मल्ल्याने काय जिल्हा बँकेतून कर्ज घेतले होते. आता अँक्सिस बँकेचा घोटाळा समोर येत आहे. त्या बँकेला तर क्लिनचिट पण देऊन टाकली आहे. सरकारने जाहिर करावे, की आता शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकांवर निर्बंध लावून ते पुढे शेतकऱ्यांवर प्राप्तीकर लावणार आहेत का?. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घरी पैसे घरपोच मिळत आहेत, पण जे देशप्रेमी आहेत त्यांना पैशांसाठी रांगेत उभे रहायला लागत आहे. नालासोपारा येथील शिवसैनिकाकडे मिळालेली रक्कम सुभाष देशमुख यांच्याकडे मिळालेल्या रक्कमेसारखी आहे का, हे आम्ही तपासून पाहत आहोत.

Web Title: Uddhav Thackeray criticse BJP