Uddhav Thackeray Dasara Melava: शिंदे गट, भाजप ते राहुल नार्वेकर; उद्धव ठाकरेंचे शब्दाचे बाण! १० महत्वाचे मुद्दे...

Uddhav Thackeray Dasara Melava
Uddhav Thackeray Dasara Melava

Uddhav Thackeray Dasara Melava: उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवरुन शिंदे गट, भाजप यांच्यावर जोरदार टीका केली. भाजप विघ्नसंतोषी आहे. भाजप अवलादी लक्षणाची पार्टी जिथे जाते तिथे सत्यानाश करते, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे जाणून घेऊया...

  • राज्यकर्त्यांच कर्तव्य असतं, पोट कोणत्याही जातीच असो, ते भरलं गेलच पाहिजे. मी तुम्हांला किंमत देत नाही कारण माझ्यासमोर महाराष्ट्रातील गोरगरीब आहे. जरांगे पाटलांना धन्यवाद यासाठी की जातीपातीच्या भिंती उभ्या करुन आपापसात झुंजवण्याच जे कारस्थान भाजप करतंय त्याला आपल्याला सर्वांना मिळून मोडुन तोडुन टाकायचंय.

  • सगळे मराठा, सगळे मराठी... एका मातीची आपण लेकरं. पण ज्याच्याशी आपण लढतोय तो साधासुधा नाही, तो कपटी आहे, विघ्नसंतोषी आहे आणि भाजप इतका विघ्नसंतोषी आहे की कुणाचही लग्न असो, हे येणार, भरपूर जेवणार, सगळ्या पुरणपोळ्या फस्त करणार आणि निघताना नवराबायकोत भांडण लावुन दुसर्‍या लग्नात जेवायला जाणार, अशी ही अवलाद आहे.

  • पुन्हा पुन्हा सांगतोय, भारतीय जनता पक्ष असेल किंवा त्याकाळचा जनसंघ असेल, यांचा कोणत्याही लढ्याशी सुतराम संबंध नव्हता. स्वातंत्र्यलढ्याशी संबंध नव्हता, मराठा मुक्ती संग्राम लढ्यामध्ये त्यांच कधी नाव ऐकल नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील ते नव्हते. संयुक्त महाराष्ट्र समितीत ते आले, चळवळीत नव्हते.  म्हणून सगळ्यात शेवटी जनसंघ समितीत सामिल झाला, आणि सर्वात आधी बाहेर पडला, जागेवाटपाच भांडण करून! विघ्नसंतोषी म्हणतात ते याला.

  • मग जनता पक्षात गेले, तिकडे तोडफोड केली, मग शिवसेनेसोबतत आले, तिकडे अकाली दलाबरोबर गेले, कधी नितीशबरोबर, कधी याच्याबरोबर, कधी त्याच्याबरोबर, गोव्यात मम पक्षाबरोबर... हे अवलादी लक्षणाची पार्टी जिथे जाते तिथे सत्यानाश करते, म्हणून जरांगे पाटलांना सांगतो, पहिले यांच्यापासून सावध रहा.

  • भगवा इकडे डौलाने मानाने फडकतो. पण त्यात दुही. पानिपतचा अब्दाली आला होता, त्याने हेच केलं होतं. दुहीची बीज पेरायची, भांडण लावायची आणि मग त्या भांडणांमध्ये खरे प्रश्न जे आहेत, बेकारी असेल. महागाई असेल त्याच्याकडे कुणाचे लक्षा जाता कामा नये. तुमच्या चुली पेटविण्याऐवजी तुमची घरदारं आम्ही पेटवतो आणि मग तुमचे रक्षणकर्ते म्हणून तुमच्या पेटत्या घरांच्या होळीवर आम्ही आमची पोळी भाजते.

  • एक वर्ष होऊन गेलं, आपण अपात्रतेच्या केस संदर्भात सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. तारीख वर तारीख. सर्वोच्च न्यायालय कानफाटे फोडतंय परंतु हे निर्लज्जं सदा सुखी. कानफाट फोडलं तरी गाल चोळत सांगतात, आम्ही आमच टाईमटेबल सादर करू, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केली.

Uddhav Thackeray Dasara Melava
Dasara Melava: आमदार अपात्रतेचा निकाल 50 वर्षांनी लावा, पण...; उद्धव ठाकरेंनी केलं सरकारला आव्हान
  • मी कोणाचाही अपमान करू इच्छित नाही, न्यायाधीश न्यायमुर्तींचा तर करूच शकत नाही. पण ज्यापद्धतीने हे सर्व चाललेलं आहे ते पाहुन एक विनोद लक्षात येतो, एकदा भरल्या कोर्टात न्यायमूर्ती बसलेले असतात, आणि केस चालू असतात. कोणाला तारीख दे, कुणाला न्याय दे, कुणाच हिअरिंग घे आणि मग सोबत कोण असतो त्याला विचारतात, 'पूढची केस कोणती आहे?' तो सांगतो. एका वीस वर्षाच्या मुलीची छेड काढलेल्याची केस आहे. आता मुलीची छेड काढली म्हंटल तर कोणीही चिडणार. बोलवा त्याला, आणा समोर. आरोपीच्या पिंजर्‍यात एक आजोबा काठी टेकत येतात. न्यायाधिशांच डोक अजुन फिरतं, तुम्हाला लाज नाही वाटतं, आजोबा झालातं, काठी टेकत चालता आणि वीस वर्षाच्या मुलीची छेड काढता? शरम नाही वाटतं. आजोबा शांतपणे न्यायाधिशाकडे बघतात आणि सांगतात, "न्यायाधिश महाराज, जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सुद्धा वीस वर्षाचा होतो."

  • आता माझं स्पष्ट म्हणणं आहे, ठीक आहे, तुम्ही आम्ही केलेल्या अपात्रतेचा निर्णय लावायचा तेव्हा लावा, वीस वर्षांनी लावा / पन्नास वर्षांनी लावा. आज संपूर्ण देश बघतोय, जग बघतंय, ते केवळ अपात्रतेच्या निर्णयाकडे बघत नाही. तर या आपल्या हिंदुस्थानमध्ये, भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणून जे काही आहे त्याला हा लवाद जुमानत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्व राहणार आहे की नाही? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेचे अस्तित्व शिल्लक राहणार आहे की नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अनेक क्रांतिकारकांनी, अनेक योद्ध्यांनी रक्त सांडून, बलिदान देऊन जी आपली भारतमाता स्वतंत्र केली, त्या भारतमातेची लोकशाही टिकणार की नाही? बघुया तीस तारखेला काय होतं? जनतेने ठरवून टाकलं. निवडणूका घेऊन टाका, जनता जनार्दन ठरवेल ते पात्र आहेत की अपात्र!

  • सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला नक्की अपेक्षा आहे. भले आपले माननीय पंतप्रधान मोदीजी बोलले घराणेशाही. होय मी घराणेशाहीचा पाईक आहे, कारण मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे, सर्व पूर्वजांचा अभिमान आहे. जो कुटुंबव्यवस्था मानत नाही त्याने दुसर्‍याच्या घराण्याबद्दल बोलू नये, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

  • पहिले कुटुंबव्यवस्था माना आणि मग हिंदुत्वाबद्दल बोला. कारण कुटुंबव्यवस्था हा हिंदुत्वाचा पाया आहे. तोच जर तुम्हांला मान्य नसेल तर तुम्हीं आमच्यावर बोलणारे कोण? तुम्हाला काहीही अधिकार नाही.

Uddhav Thackeray Dasara Melava
Uddhav Thackeray Dasara Melava: "गद्दारांनी दिल्लीची चाकरी करावी, निवडणुकीची गरज भासणार नाही"; दानवेंची शिंदे गटावर टीका
  • कोरोना काळात महाराष्ट्र माझं कुटुंब मानुन 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' म्हणून मी काम केलं. मला अभिमान आहे की एक नात 'कुटुंबप्रमुख' म्हणून मला महाराष्ट्राच्या जनमानसात स्थान मिळालं.

  • घराणेशाहीला विरोध करायचाय ना? जरुर करा, मग आम्ही पोसलेली घराणेशाही आधी खाली करा. बाप मंत्री, मुलगा खासदार, आमदार, हे सगळं जे चाललंय ते खाली करा. सगळीच घराणी काही चांगली नसतात किंवा सगळी वाईट नसतात. जो ज्या घराण्याचा तशी त्याची ओळख ठरते.

  • आणखीन एका घराण्याची परंपरा मी आवर्जुन सांगेन, सर्वोच्च न्यायालयाचे चंद्रचुड साहेब, त्यांचे वडील्सुद्धा सरन्यायाधीश होते आणि कडक होते, कणखर होते. शेवटी इतिहासात आपली नोंद काय होते याची खबरदारी प्रत्येकाने घ्यायची.

  • या बोंबलणार्‍यांना सांगयचंय, तुमचे नेते दिल्लीहून रिकाम्या थाळ्या बडवायला लावत होते, गो कोरोना गो बोलायला सांगत होते त्या वेळेला आमच्या सरकारने गोरगरिबांना पाच रुपयात रिकामी नाही, भरलेली थाळी शिवभोजन म्हणून दिली. रिकाम्या थाळ्या बडवायला लावणारं तुमचं हिंदुत्व आणि गोरगरिबांना शिवभोजन देणार आमच हिंदुत्व आहे.

  • तुमचे ते महामहिम काळी टोपी यांनी पत्र दिलं होतं, माझ्याकडे काही लोक आली होती. तुम्हाला काही इश्वरी संकेत येतात का की तुम्ही मंदिर बंद ठेवली आहेत. किती विक्षिप्त बिभत्स माणसं असतातं. जेंव्हा तुम्ही मंदिर उघडा सांगत होता तेव्हा आम्ही गावोगावी, खेडोपाडी आरोग्य मंदिर उघडत होतो. हे आमचं हिंदुत्व आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com