ठाणे, उल्हासनगरमध्येही मालमत्ता करात सूट- उद्धव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

पाच वर्षापूर्वी करून दाखवल असे आम्ही म्हटले होते. आता 'डीड यू नो' असे आम्ही सांगत आहोत. युतीची चर्चा सुरु असून, माझ्याकडे अद्याप प्रस्ताव आलेला नाही.​

मुंबई - मुंबईप्रमाणे ठाणे आणि उल्हासनगरमध्ये 500 चौरस फुटांपर्यंत घर असलेल्या नागरिकांना मालमत्ता कर द्यावा लागणार नाही. तर, 700 चौरस फुटांवरील घरांना करात सवलत देण्यात येईल, असे आश्वासन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिले.

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज (रविवार) उद्धव ठाकरे यांनी ठाणे आणि उल्हासनगरमधील नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून काही घोषणा केल्या. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच मुंबईसाठी मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा केली होती. आता ती पुन्हा सत्तेत आल्यास ठाणे आणि उल्हासनगरमध्येही लागू करणार असल्याचे आश्वासन दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले, की पाच वर्षापूर्वी करून दाखवल असे आम्ही म्हटले होते. आता 'डीड यू नो' असे आम्ही सांगत आहोत. युतीची चर्चा सुरु असून, माझ्याकडे अद्याप प्रस्ताव आलेला नाही. ठाणेकरांसाठी शिवसेनेकडून स्वतंत्र धरण बांधण्यात येईल. तसेच ठाण्यात 30 एकर परिसरात सेंट्रल पार्क उभारण्यात येईल. गेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी फक्त मुंबई आणि ठाण्यात सभा घेतली होती. शिवसेनेचे ठाण्याबरोबर कायम नाते राहिले आहे. भविष्यात जलवाहतूकीला प्राधान्य देण्यासाठी ठाणे महानगरपालिका पुढाकार घेणार आहे. सत्ता आल्यास त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मुंबई महानगरपालिकेत सत्ता आल्यास शालेय विद्यार्थ्यांना बेस्ट बसचा प्रवास मोफत करणार आहोत. तसेच महापालिका कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्यात येणार आहे. स्वच्छता करातून व्यापाऱ्यांची मुक्तता करण्यात येईल.

Web Title: Uddhav Thackeray declares scheme in Thane