
Uddhav Thackeray : 'मो गँबो आया था'! अमित शहांच्या पुणे दौऱ्यावर ठाकरेंची जहरी टीका
मुंबई - शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्ष चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला दिलं आहे. तेव्हापासून उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहे. ते सातत्याने शिंदे गटावर हल्लाबोल करत आहेत. मात्र आज उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र आणि उत्तर भारतीयांचा संबंध जुना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला काशीहून गा.गा. भट्ट आले होते. निवडणूक आयोगाने आमचा धनुष्यबाण हिसकावला. मात्र तुमच्या रुपाने प्रभू श्रीराम माझ्यासोबत आले आहेत. मी आव्हान दिलं आहे. तुम्ही मर्द आहात, या मैदानात मी येतो, मशाल घेऊन. मग पाहू.
राज्यात महाविकास आघाडी झाली. मात्र भाजपनेच काँग्रेससोबत जाण्यास भाग पाडलं. पण मी भाजपला सोडलं. हिंदुत्व सोडलं नाही. भाजपचं जे हिंदुत्व आहे, ते आमचं हिंदुत्व नाही. बाळासाहेबांनी सांगितलेलं हिंदुत्व आम्ही मानतो. आमचं हिंदुत्व राष्ट्रीयत्, असंही उद्धव म्हणाले.
उद्धव ठाकरे पुढं म्हणाले की, काल पुण्यात कोणीतरी आलं होतं. त्यांनी विचारलं, महाराष्ट्रात काय सुरू आहे? त्यावर हे म्हणाले, आज चांगला दिवस आहे. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह सोबत आलेल्या गुलामांना देऊन टाकलं. मग तो व्यक्ती म्हणतो, वाह! मो गँबो खूश हुआ. होय ते मो गँबोच आहे. मिस्टर इंडियात असच होतं ना. देशातील लोक भांडत राहावे आणि आपण राज्य करायचं, असच मो गँबोला वाटत होतं, अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी अमित शहांना टोला लगावला.
हिंदु असो वा नसो, तुम्ही आमच्या पक्षात आले की, हिंदू. मी काय चूक केली सांगा. मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षाच्या काळात मी कधी भेद केला. कोणामध्ये कधी भांडण लावलं का? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.