Local Body Election: अकोल्यात विरोधकही एकत्र; ठाकरे गटाचा वंचितला पाठिंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray-Prakash Ambedkar

Local Body Election: अकोल्यात विरोधकही एकत्र; ठाकरे गटाचा वंचितला पाठिंबा

अकोला : अकोल्यात आज सात पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतींपदासाठी निवडणुका पार पडल्या. यामध्ये खूप वेगळे राजकीय समीकरणे पाहायला मिळाली आहेत. मुर्तीजापूर येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला असून या निवडणुकीत विरोधकही एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.

(Uddhav Thackeray And Prakash Ambedkar Alliance In Local Body election Akola)

आज अकोल्यातील सात पंचायत समित्याच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकांचे निकाल लागले असून सातपैकी चार पंचायत समित्यावर वंचितने आपली बाजी मारली आहे. तर मुर्तीजापूर येथे ठाकरे गटाने वंचितला पाठिंबा देत उपसभापतीपद पटकावले आहे.

अकोटमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचा सभापती निवडून आला असून त्याला भाजप, प्रहार काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. बार्शी टाकळीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचा सभापती निवडून आला असून त्याला पाठिंबा भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीने दिला आहे. त्याचबरोबर मुर्तीजापूरमध्ये ठाकरे गटाने वंचितलाच पाठिंबा देऊन उपसभापतीपद मिळवलंय.

हेही वाचा: Sharad Pawar : "अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, राजकीय परंपरा पाळा"

दरम्यान, सध्या राज्यात कोणतेही राजकारण चालू असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांत विरोधकही एकत्र आल्याचं चित्र अकोल्यात पाहायला मिळालं आहे. तर शिवसेनेचा ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्यामुळे आता राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

अकोटमध्ये सेना, भाजप, काँग्रेस, प्रहार एकत्र

जवळपास २० वर्षे पंचायत समितीवर वर्चस्व गाजविणाऱ्या वंचितला सत्ता समिकरणाची जुळवाजुळव करण्यात अपयश आल्याने सेना, भाजप, काँग्रेस, प्रहार या पक्षांनी एकत्र येऊन सभापती व उपसभापती पद आपल्याकडे खेचून आणले. त्यामुळे अकोट पंचायत समितीमधील सत्तेचे हे नवीन समीकरण सर्वांनाच धक्का देणारे ठरले आहे.

हेही वाचा: Video : मराठा समन्वयक रमेश केरेंचा आत्महत्येचा प्रयत्न; फेसबुक लाईव्ह करत विष घेतलं

बार्शी टाकळीत राजकीय उलथापालथ

बार्शी टाकळी पंचायत समितीवर वंचितची सत्ता होती पण बदलत्या समीकरणामुळे महाविकास आघाडी आणि भाजपकडून वंचितला सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्यामुळे वंचितला आपली सत्ता राखता आली नसून राज्यस्तरीय राजकारणात विरोधक असलेल्यांनीही एकमेकांना पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे.