उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल! मर्यादा वाढवून मराठ्यांना आरक्षण का दिले नाही? डॉ. बाबासाहेबांचे महत्त्व कमी करण्यासाठी संविधान बदलण्याचा डाव

देशातील विविध समाजाचे आरक्षण कोणीही संपवू शकत नाही, ते कोणी रद्द करू शकत नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत. मग, महाराष्ट्रातील मराठा समाजातील तरुण आरक्षणासाठी आत्महत्या, आंदोलने करीत असतानाही तुमच्या हातातील आरक्षणाची मर्यादा वाढवून त्यांना आरक्षण का दिले नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे.
maharashtra
maharashtrasakal

सोलापूर : देशातील विविध समाजाचे आरक्षण कोणीही संपवू शकत नाही, ते कोणी रद्द करू शकत नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत. मग, महाराष्ट्रातील मराठा समाजातील तरुण आरक्षणासाठी आत्महत्या, आंदोलने करीत असतानाही तुमच्या हातातील आरक्षणाची मर्यादा वाढवून त्यांना आरक्षण का दिले नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे.

‘इंडिया’च्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारानिमित्त आज (सोमवारी) उद्धव ठाकरे यांची सोलापुरात प्रचारसभा झाली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम, प्रकाश यलगुलवार, अनिल कोकीळ आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, भाकड जनता पार्टीचे नेते प्रचाराच्यानिमित्ताने आज राज्यभर फिरत आहेत, पण त्यांनी आता २०२४च्या निवडणुकीत कोपराला गूळ लावला आहे. तो कोणाला खाताही येणार नाही आणि काढताही येणार नाही. दरम्यान, दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सरकार आल्यावर धनगर समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही पंढरपुरात दिली होती, पण अजूनही त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही. दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय पूर्णपणे केंद्र सरकारच्या हातात असतानाही आरक्षणाची मर्यादा पंतप्रधान मोदींनी वाढविली नाही आणि त्यासाठी राज्यातील त्यांच्या नेत्यांनी काहीच केले नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. आता देशात हुकूमशहा असून पुन्हा त्यांना निवडून दिल्यास जुलमी हुकुमशहाचे राज्य येईल. त्यांनी पीएम केअर फंड, निवडणूक रोख्यातून मोठा भ्रष्टाचार केला. ‘सबका साथ सबका विकास’ म्हणून सत्तेवर बसले, पण त्यांनी दहा वर्षांत सबका साथ अन्‌ त्यांच्याच मित्रांचा विकास केला, अशी टीकाही त्यांनी केली.

जय भवानीच्या महात्म्याबद्दल बोलावेच लागेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (मंगळवारी) धाराशिवमध्ये सभेसाठी जाणार आहेत. त्यावेळी त्यांनी तुळजाभवानीचे दर्शन घ्यावे, भवानी मातेच्या महात्म्याबद्दल बोलावे. जर त्यांनी त्याबद्दल नाही बोलले तर त्यांना महाराष्ट्राबद्दल आकस आहे असे जनता समजेल आणि जर ते जय भवानीबद्दल बोलले तर निवडणूक आयोगाने आम्हाला जसे जय भवानी शब्द काढायला सांगितला, तशीच कारवाई त्यांचा घरगडी असलेल्या निवडणूक आयोगाने मोदींवरही करावी, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

डॉ. बाबासाहेबांचे महत्त्व कमी करण्यासाठी भाजपचा संविधान बदलण्याचा डाव

महाराष्ट्राच्या अस्मितेची शिवसेना चोरली, जय भवानी शब्द हटवायला सांगितले आणि महाराष्ट्रातील उद्योग दुसरीकडे पळवले. महाराष्ट्राबद्दल भाजपला तथा पंतप्रधान नरेंद्र मोदींना आकस असून त्यांना देशाची घटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलून त्यांचे महत्त्व देखील कमी करायचे आहे. दलित कुटुंबात जन्मलेला हा तरुण, ज्याने देशाची घटना लिहिली आणि त्याप्रमाणे आम्ही चालायचे, आम्हाला लोक महत्त्व कसे देणार, देव कसे मानणार म्हणून त्यांना संविधान बदलायचे आहे, असा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

खासदार महास्वामींचाही वापर करून घेतला

अमरावतीच्या उमेदवाराचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले, मग सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींना २०१९ च्या निवडणुकीत त्यांच्या भक्तांची मते पाहिजे म्हणून त्यांना उमेदवारी दिली. आता त्यांचे प्रमाणपत्र वैध न ठरविता त्यांना अलगद बाजूला केले. त्यांचा केवळ निवडणुकीपुरता वापर करून घेतला, आता त्यांनाही पश्चात्ताप होत असेल. पण, त्यांनी त्यांच्या शक्तीतून त्या व्यक्तींना शाप देऊन पराभूत करावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com