उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस; आज ब्रह्मास्त्रांचा वापर 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

आज शक्तिप्रदर्शन 
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या आजच्या सभेत दोन्ही पक्ष शक्तिप्रदर्शन करतील. जो जास्त गर्दी जमवेल त्याच्याकडे मतदारांचा कौल झुकण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी गर्दी जमवण्यासाठी कंबर कसली आहे. 

मुंबई : प्रचाराच्या शेवटच्या सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या मंत्र्यांचे 'राजीनामा अस्त्र' भाजपवर सोडतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाकरे कुटुंबाची संपत्ती जाहीर करून मातोश्रीवर बॉम्बगोळा टाकतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे; परंतु या दोन नेत्यांपैकी कुणाचे ब्रह्मास्त्र कुणाच्या वर्मी लागते आणि कोण ते परतवून लावतो यावर मुंबईसह दहा महापालिकांच्या निवडणूक युद्धाचा निकाल ठरणार आहे. 

निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या सभा उद्या (ता. 18) होत आहेत. या सभेत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणते मास्टर स्ट्रोक लगावतात, यावर राज्याच्या राजकारणाची दिशा ठरू शकते आणि त्याचा प्रभाव राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ राहू शकतो, असे जाणकारांचे मत आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकीचे प्रचारयुद्ध उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस असेच सुरू आहे. फडणवीस यांनी शिवसेनेला औकात दाखवण्याची भाषा केल्यापासून शिवसेनेचे नेते संतापून उठले. जाहीर सभांमध्ये उद्धव भाजपवर तुटून पडले, तर सोशल मीडियावर शिवसेनेने भाजपविरोधात वातावरण तापवले. त्यात राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरू करून शिवसेनेने आपल्याविषयी मतदारांमध्ये सहानुभूती आणि भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण केली. उद्धव यांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याबद्दल ठोस भूमिका मांडली नसली तरी चर्चेमुळे भाजपचे उमेदवार चिंतीत झाले. स्वाभिमान दाखवून मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी शिवसेनेचे मंत्री उद्या वांद्रे-कुर्ला संकुलातील शेवटच्या सभेत राजीनामा देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ठाकरे आणि फडणवीस या दोन मातब्बर नेत्यांचे राजकारण मुंबईत डावावर लागले आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते हवी ती किंमत मोजून आपली राजकीय प्रतिष्ठा वाचवण्याचा प्रयत्न करतील. शेवटच्या टप्प्यात भाजपने दिल्लीहून मंत्र्यांची आणि उत्तर भारतीयांची फौज मैदानात उतरवली; परंतु भाजपचा राज्यातील चेहरा असलेल्या मुख्यमंत्र्यांनीही महापालिकांच्या प्रचाराचा तंबू एकहाती सांभाळला. शिवसेनेच्या वाघाला घायाळ करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. शिवसेनेने थेट मुख्यमंत्र्यांवर हल्ला केल्यानंतर त्यांनी कंबाटाचे प्रकरण बाहेर काढून उद्धव यांनाच लक्ष्य केले. चुनाभट्टीच्या सोमय्या मैदानावरील शेवटच्या सभेत मुख्यमंत्री ठाकरे कुटुंबाबाबत नेमका कोणता गौप्यस्फोट करतात, याची उत्सुकता टिपेला पोचली आहे. 

भाजपची आव्हाने, आरोपास्त्रे 

 • शिवसेनेचा पारदर्शक कारभाराला विरोध 
 • मुंबईला पाटण्याच्या संगतीत बसवले 
 • मुलुंड डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी बिल्डरकडून पैसे घेतले 
 • उद्धव यांनी आपली संपत्ती जाहीर करावी 
 • सात कंपन्यांमध्ये शिवसेनेच्या कोणत्या नेत्याचे पैसे गुंतले आहेत? 
 • कचरा घोटाळ्यात कोणी पैसे खाल्ले? 
 • नालेसफाई आणि रस्ते गैरव्यवहारातील पैसे कोठे गेले? 
 • कंबाटा कंपनीत शिवसेनेने मालकधार्जिणे करार केले, कामगारांचे नुकसान केले 
 • - कंबाटा कंपनीतून 22 शाखाप्रमुखांसह कोणाकोणाच्या घरच्यांना पगार मिळतो? 

शिवसेनेची उत्तरे 

 • मुंबई महापालिका देशात अव्वल असल्याचा केंद्राचा अहवाल 
 • मुंबईचे पाटणा केले असेल तर शिवसेना राजकरण सोडेल, नाहीतर तुम्ही सोडा 
 • किरीट सोमय्या बिल्डरकडून पैसे घेऊन डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी करतात 
 • डम्पिंग ग्राऊंडचा भूखंड कोणत्याही बिल्डरला देणार नाही 
 • देवनार डम्पिंग कंत्राटाचा प्रस्ताव पुन्हा चर्चेला घ्यावा, अशी आशीष शेलारांचीच मागणी 
 • रस्ते दुरुस्ती गैरव्यवहार चौकशीची मागणी महापौरांनीच केली. या गैरव्यवहारात कोणत्याही शिवसेना नेत्याचे नाव नाही 
 • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांची संपत्ती जाहीर करा 

शिवसेनेची आव्हाने, आरोपास्त्रे 

 • मंत्रालयाचे गुंडालय करायचे आहे का? 
 • ओमी कलानी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा एकाच माळेचे मणी 
 • निवडणुकीच्या तोंडावर भाजप फक्त घोषणा करतो 
 • नोटाबंदीमुळे 100 जणांचा जीव गेला 
 • नागपूरच्या खड्ड्यांचा हिशेब द्या 
 • मुख्यमंत्री नागपूरचे महापौर असताना विनानिविदा कामे दिली. नंदलाल समितीचा ठपका 
 • कॉंग्रेसची उरलेली कामे भाजप करतोय 
 • कॉंग्रेस हा भाजपची बी टीम 

भाजपची उत्तरे 

 • ज्यांचा काळा पैसा अडकला तेच नोटाबंदीच्या विरोधात 
 • मुंबईत भ्रष्टाचाराचा खड्डा 
 • नंदलाल समिती हा कॉंग्रेसचा डाव 
 • शिवसेनेतच सर्वाधिक गुन्हेगार उमेदवार 
 • मेट्रोचे काम अभाजपने सुरू केले 

शिवसेनेचे प्लस पॉईंट 

 • सहानुभूती मिळवण्यात यशस्वी 
 • भाजपला थेट भिडण्याची तयारी 
 • ऐन वेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी 
 • भाजपविरोधात वातावरण पेटवण्यात यश 
 • गुजराती आणि मुस्लिम उमेदवार रिंगणात 

शिवसेनेचे मायनस पॉईंट 

 • उमेदवार निवडीत गोंधळ 
 • घराणेशाही जपली 
 • पक्षाअंतर्गत नाराजी 
 • भ्रष्टाचाराचे आरोप 
 • भाजपसह सत्ता भोगूनही भाजपवरच आरोप 
 • प्रस्थापितांविरोधात कल 

भाजपचे प्लस पॉईंट 

 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा 
 • विकासाचा अजेंडा 
 • नवमतदारांचा पाठिंबा. तरुणांचा प्रतिसाद 
 • केंद्र आणि राज्यात सत्तारूढ 
 • सर्वभाषक मतदारांचा पाठिंबा 

भाजपचे मायनस पॉईंट 

 • मुख्यमंत्र्यांशिवाय अन्य चेहरा नाही 
 • काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप 
 • गुंडांना प्रवेश दिल्याचा आरोप 
 • लोकांमध्ये अपरिचित, घराणेशाहीतील उमेदवार 
 • मुंबईसाठी कोणताही नवा प्रकल्प नाही 
 • शिवसेनेसह सत्तेत असूनही शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप 
Web Title: Uddhav Thackray Devendra Fadnavis Mumbai municipal corporation