
Shivsena Symbol News: उद्धव ठाकरेंच्या देवघरातील धनुष्यबाणही शिंदेंचा? मुख्यमंत्री म्हणाले मी बोललो तर...
Shivsena News: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्हं आणि नाव एकनाथ शिंदे गटाला दिलं. त्यानंतर ठाकरे गटाकडून आरोप प्रत्यारोप करण्यात आले. तर उद्धव ठाकरे यांनी बोलताना निवडणूक आयोगाने कागदावरचे धनुष्यबाण मिंधे गटाला दिले असले तरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे खरे धनुष्यबाण माझ्याकडे आहे. शिवसेना स्थापन झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुखांनी हे चिन्ह देव्हाऱ्यात ठेवलं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं होतं. त्यानंतर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी एक ट्वीट केलं होतं.
शीतल म्हात्रे यांनी आपल्या ट्वीटमध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिलेला होता, असं म्हटलं होतं. शीतल म्हात्रेंनी केलेल्या या ट्विटची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगली. दरम्यान, यावर पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी यावर हसून उत्तर दिलं आहे.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता, मी दिलेल्या गोष्टी काढत नाही. मी बोललो तर अनेकांच्या अडचणी होतील, असा सूचक इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. मी दिलेल्या गोष्टी कधी काढत नाही आणि त्यावर बोलणार नाही. मला बोलायला लावू नका. मी बोललो तर अनेकांची अडचण होईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. आम्हाला संपत्तीचा मोह नाही, कधीही नव्हता. आम्हाला कुणाचीही संपत्ती नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. याउपर आम्हाला बोलायचं नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी जाहीर करत सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. त्यावर आता सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा दोन्ही गट एकमेकांना लक्ष्य करताना दिसून येत आहेत.