Mumbai BEST Bus : आगीच्या घटनेनंतर बेस्टच्या ४०० सीएनजी बसेस सेवेतून कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

400 CNG buses of BEST out of service after fire incident BEST initiative  Mumbai

Mumbai BEST Bus : आगीच्या घटनेनंतर बेस्टच्या ४०० सीएनजी बसेस सेवेतून कमी

मुंबई : अंधेरीच्या आगरकर चौक येथे प्रवाशांनी भरलेली बस रिकामी होताच आगीची घटना घडली. या घटनेत संपूर्ण बस जळून खाक झाली. बेस्टची तिसरी बस जळण्याच्या घटनेनंतर मातेश्वरी या कंत्राटदाराच्या भाडेतत्वावरील ४०० बसेस ताफ्यातून कमी करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे.

टाटा मार्कोपोलो या कंपनीकडून या बसेस बेस्टच्या विविध डेपोंमध्ये चालवण्यात येत होत्या. त्यामुळे उद्यापासून या कमी झालेल्या बसेसच्या मार्गावर प्रवाशांची गैरसोय होणार आहे. बेस्टच्या प्रतिक्षा नगर, सांताक्रुझ, मरोळ आणि धारावी या चार डेपोत एकुण ४०० बसेस चालवण्यात येत होते. या सर्व बसेस नॉन एसी आणि सीएनजी बसेस होत्या.

मातेश्वरी या कंत्राटदाराकडून पुरवण्यात आलेली बस जळण्याची ही अवघ्या दोन महिन्यातील तिसरी घटना आहे. याआधी दिल्लीतही अशा प्रकारच्या आगीची घटना घडली होती. मुंबईतील याआधीच्या दोन घटनेनंतर बेस्ट परिवहन विभागाने बैठक घेऊन या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली होती.

जोवर कंत्राटदाराकडून आग लागण्याच्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, अशी हमी कंत्राटदाराकडून मिळत नाही, तोवर या बसेस वापरात येणार नाहीत, असे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले. या बसेस कमी करण्याचा सर्वाधिक फटका हा प्रतिक्षा नगर येथील डेपोला बसणार आहे. याठिकाणाहून १०० बसेस चालवण्यात येतात. त्यामुळे उद्यापासून चार डेपोंमध्ये सुमारे ३६ मार्गांवर या बसेस कमी करण्याचा परिणाम होणार आहे.