उद्धव यांचे थेट पंतप्रधानांना आव्हान? 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

मुंबई - राज्यातील स्थानिक संस्था निवडणुकीच्या मैदानात भारतीय जनता पक्षाला आव्हान दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना थेट आव्हान देणार आहेत. राज्यातील प्रचाराच्या दौऱ्यात वेळ मिळाल्यास किंवा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर ठाकरे वाराणसीला रवाना होणार असून, त्या ठिकाणी गंगा आरती करणार आहेत. 

राज्यातील मुंबईसह दहा महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या तोंडावर गेल्या 25 वर्षांपासूनची शिवसेना-भाजप युती तोडल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. या वेळी 25 वर्षे युतीमुळे सडल्याची खंत व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील प्रचार सभा सुरू झाल्या असून, त्यामध्ये थेट नरेंद्र मोदी आणि भाजपवर ते टिकास्त्र सोडत आहेत. गुजरातमधील पाटीदार पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी मातोश्रीला भेट दिल्यानंतर भविष्यात गुजरातमधील निवडणुका लढविणार असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले. 

राज्यातील स्थानिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने राज्यासह अन्य राज्यांत पक्षाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काही दिवसांतच आपण वाराणसी येथे गंगा आरती करणार असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले आहे. भारतीय जनता पक्षाबाबत शिवसेनेची बदललेली भूमिका, उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका आणि तेथे शिवसेना लढवत असलेली निवडणूक यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यातील स्थानिक निवडणुकीचा निकाल 23 फेब्रुवारी रोजी लागणार असून, त्यानंतर उत्तर प्रदेशात चार टप्प्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उत्तर प्रदेशातील दौऱ्याचा कार्यक्रम अद्यापपर्यंत निश्‍चित झाला नसल्याने तेथील प्रचार सभांबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील प्रसारमाध्यमांशी ते संवाद साधण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Uddhav's direct challenge to the Prime Minister