'यू-डायस' प्रणालीत शाळांनी भरलेल्या माहितीची पडताळणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

केंद्र सरकारकडून राज्यातील ऑनलाइन माहिती भरलेल्या शाळांचे मूल्यांकन "यू-डायस प्लस' प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. त्या माहितीमध्येच चुका असतील दर देशाच्या क्रमवारीत राज्याला मागे राहावे लागणार आहे. ते टाळण्यासाठी "यू-डायस प्लस' प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन माहिती भरलेल्या शाळांची पडताळणी करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांवर दिली आहे.

सोलापूर - केंद्र सरकारकडून राज्यातील ऑनलाइन माहिती भरलेल्या शाळांचे मूल्यांकन "यू-डायस प्लस' प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. त्या माहितीमध्येच चुका असतील दर देशाच्या क्रमवारीत राज्याला मागे राहावे लागणार आहे. ते टाळण्यासाठी "यू-डायस प्लस' प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन माहिती भरलेल्या शाळांची पडताळणी करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांवर दिली आहे.

"यू-डायस प्लस' प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन भरलेली माहिती चुकीची असेल तर, त्याचा परिणाम जिल्ह्याच्या व राज्याच्या गुणांकनावर होणार आहे. त्यामुळे या माहितीची पडताळणी केंद्र प्रमुखांनी 100 टक्के, विस्तार अधिकाऱ्यांनी 50 टक्के, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी 20 टक्के, तर शिक्षणाधिकाऱ्यांनी 10 टक्के करायची आहे. शैक्षणिक बाबतीत पडताळणी करण्याची जबाबदारी शिक्षण विभागावर दिली आहे. याशिवाय शाळेतील भौतिक सुविधांच्या बाबतीत पडताळणी करण्यासाठीची जबाबदारी अभियंत्यांकडे दिली आहे.

जिल्ह्यातील सर्व शिक्षा अभियानाच्या कनिष्ठ अभियंत्यांनी 100 टक्के, कार्यकारी अभियंत्यांनी 20 टक्के शाळांच्या माहितीची पडताळणी करायची आहे. शाळांच्या माहितीच्या पडताळणीनुसार माहिती अद्ययावत करण्याच्या सूचनाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या सहसंचालक डॉ. सुवर्णा खरात यांनी दिल्या आहेत.

त्रुटी निघाल्यास कारवाई
शाळांनी भरलेल्या माहितीची पडताळणी केल्यानंतरही जर केंद्र सरकारकडून मूल्यांकन करताना काही त्रुटी निघाल्या तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर असेल. त्रुटी निघाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udise process School Information Checking