विधान परिषदेत विरोधकांना एकीचे फळ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

मुंबई - विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल लागले असून, त्यापैकी अमरावती पदवीधर मतदारसंघात गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी एकतर्फी विजय संपादन करीत मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा जपली आहे. त्याचबरोबर भाजपच्या पाठिंब्यावर नागपूर शिक्षक मतदारसंघात निवडणूक लढविलेल्या ना. गो. गाणार यांनीही आपली जागा कायम राखली असताना, कोकण शिक्षक मतदारसंघाची जागा सत्ताधारी भाजपला गमवावी लागली आहे. या ठिकाणी रामनाथ मोते यांची बंडखोरी भाजपला भोवली. तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकापला आघाडीमुळे तीन जागांवर विजय मिळवता आला. 

मुंबई - विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल लागले असून, त्यापैकी अमरावती पदवीधर मतदारसंघात गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी एकतर्फी विजय संपादन करीत मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा जपली आहे. त्याचबरोबर भाजपच्या पाठिंब्यावर नागपूर शिक्षक मतदारसंघात निवडणूक लढविलेल्या ना. गो. गाणार यांनीही आपली जागा कायम राखली असताना, कोकण शिक्षक मतदारसंघाची जागा सत्ताधारी भाजपला गमवावी लागली आहे. या ठिकाणी रामनाथ मोते यांची बंडखोरी भाजपला भोवली. तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकापला आघाडीमुळे तीन जागांवर विजय मिळवता आला. 

संजय खोडके यांच्यामुळे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना अमरावती पदवीधर मतदारसंघाची या वेळची निवडणूक जड जाईल, असे अंदाज होते. मात्र रणजित पाटील यांनी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार संजय खोडके यांचा मोठ्या फरकाने पराभव करून विरोधकांचे अंदाज धुळीला मिळवले. अमरावती आणि नागपूर वगळता अन्य तीनही ठिकाणी विरोधकांची सरशी झाली. नाशिक पदवीधर आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ यापूर्वी कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्याच ताब्यात होते. कोकण शिक्षक मतदारसंघात मात्र विरोधकांनी भाजपला मोठा हादरा दिला आहे. गेल्या वेळी शिक्षक परिषदेचे उमेदवार रामनाथ मोते यांना भाजपने पुरस्कृत केले होते. त्या वेळी मोतेंनी मोठा विजय मिळवला होता. यंदा मात्र मोते यांची शिक्षक परिषदेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे मोते यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली. परिणामी, भाजप आणि शिक्षक परिषदेच्या मतांमध्ये फाटाफूट होऊन त्याचा फायदा शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना झाला. पाटील यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिला होता. या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराने आश्‍चर्यकारकरीत्या बाळाराम पाटील यांना कडवी झुंज दिली. मोते आणि भाजप उमेदवार अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. 

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांनी चांगली बांधणी केली आहे. त्याचा फायदा त्यांना झाला. त्यांनी भाजप पुरस्कृत पत्की यांचा दणदणीत पराभव केला. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसह सहकारी मंत्र्यांनी चांगलाच जोर लावला होता. नाशिक पदवीधर मतदारसंघातून कॉंग्रेस आघाडीचे डॉ. सुधीर तांबे यांनीही पुन्हा एकदा विजय मिळवला. इथे भाजप विरुद्ध कॉंग्रेस असा थेट सामना झाला. भाजपने संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या जावयाला तिकीट दिले होते. त्यामुळे भामरे यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती. स्वतः भामरे यांच्यासह भाजपच्या राज्यातील मंत्र्यांनी या जागेसाठी जोर लावला होता. तरीही याही ठिकाणी भाजपला अपयश आले. नागपूर शिक्षक मतदारसंघाचा निकाल आज लागला असून, भाजप पुरस्कृत ना. गो. गाणार पुन्हा निवडून आले. 

निवडणुकीचा निकाल 
1) नागपूर शिक्षक मतदारसंघ ः- 
ना. गो. गाणार (भाजप पुरस्कृत) - विजयी - 

2) औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ ः- 
विक्रम काळे, राष्ट्रवादी - विजयी - 25 हजार 288 
गोविंद काळे, शिवसेना - 1150 

3) कोकण शिक्षक मतदारसंघ ः- 
विजयी उमेदवार - बाळाराम पाटील - शेकाप - - विजयी - 11 हजार 837 
ज्ञानेश्‍वर म्हात्रे, शिवसेना - 6887 
रामनाथ मोते, अपक्ष - 5988 

4) नाशिक पदवीधर मतदारसंघ - 
डॉ. सुधीर तांबे, कॉंग्रेस - - विजयी - 83 हजार 311 
डॉ. प्रशांत पाटील, भाजप - 40 हजार 486 

5) अमरावती पदवीधर मतदारसंघ - 
डॉ. रणजित पाटील, भाजप - - विजयी -78 हजार 51 
संजय खोडके, कॉंग्रेस - 34 हजार 154 

Web Title: unity in Legislative Council