solapur univercity
sakal
विद्यापीठाच्या ८१ कोटींच्या इमारती ‘वन’ जागेत! प्रशासकीय इमारत, मल्टिपर्पज हॉल, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारकाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार
तात्या लांडगे
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची हिरज रोडवर ४८२ एकर जमीन आहे. विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज एकाच छताखाली असावे म्हणून त्या क्षेत्रात ५२ कोटींची भव्य प्रशासकीय इमारत बांधली. त्याच ठिकाणी १४ कोटींचा मल्टिपर्पज हॉल व १४ कोटी ८२ लाखांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारकही बांधले जात आहे. तिन्ही कामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियोजित आहे. मात्र, तिन्ही इमारती ‘वन’ आरक्षित जागेत येत असल्याने लोकार्पणाचा तिढा निर्माण झाला आहे.
ऑक्टोबर २०२० मध्ये ४८२ एकर परिसरातील मल्टिपर्पज हॉलसाठी परवानगी मिळाली. २०२३ मध्ये प्रशासकीय इमारतीसाठी ५४.१९ कोटींचा निधी मंजूर झाला. या इमारती वन विभागाच्या जागेत उभारल्या जात असताना देखील राज्य शासनाने निधी दिला. आता पंतप्रधान लोकापर्णासाठी येणार असल्याने ती बांधकामे नियमित करण्यासाठी विद्यापीठाचा खटाटोप सुरू झाला आहे.
नव्या प्रशासकीय इमारतीकडे विद्यार्थ्यांना ये-जा करता यावे म्हणून सोलापूर-पुणे महामार्गावरील कोंडी येथून मोठा रस्ता केला जाणार आहे. पण, त्यातही वन विभागाची जागा असल्याने तो रस्ताही अडकणार आहे. ४८२ एकरातील या ६५ एकरात माळढोक, वन्यजीव व इको सेन्सेटिव्ह झोन असल्याने बांधकाम केलेल्या ८१ कोटींच्या इमारतींचा वापर वन विभागाच्या परवानगीशिवाय करता येईल का, हा मुख्य प्रश्न निर्माण झाला आहे.
वन विभागाची अटी-शर्तीनुसार परवानगी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानामधून १०० कोटींचा निधी मिळाला आहे. त्यातून हिरज रोडवरील ४८२ एकरात कामे सुरु आहेत. १४ कोटी खर्चून त्याठिकाणी ‘खेलो इंडिया’अंतर्गत १४ कोटींचा मल्टिपर्पज हॉल बांधला आहे. आता विद्यापीठाच्या पाच संकुलांचेही बांधकाम त्याच परिसरात होणार असून त्याची वर्क ऑर्डरही निघाली आहे. पण, या जागेवर फॉरेस्टचे आरक्षण असल्याने विद्यापीठाला वन विभागाशी पत्रव्यवहार करावा लागला. वन विभागाने अटी- शर्ती टाकून बांधकामास परवानगी दिली आहे. आता विद्यापीठाने वन विभागाचे पत्र जोडून संबंधित प्रातांधिकाऱ्यांकडे बांधकाम परवाना मागितला आहे.
उद्घाटनाला पंतप्रधान येणार, पण...
विद्यापीठाच्या नव्या जागेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक, प्रशासकीय इमारत व मल्टिर्पपज हॉलचे काम अंतिम टप्प्यात आहे. अहिल्यादेवींच्या जयंतीचे औचित्य साधून ३१ मे रोजी सर्व कामांचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विद्यापीठाने पंतप्रधानांना तसे निमंत्रणही दिले आहे. त्यामुळे त्यांचा दौरा निश्चित होईपर्यंत त्या जागेवरील वन विभागाचा शेरा कमी करून घेण्याचे आव्हान विद्यापीठासमोर आहे.
विद्यापीठाचा पाठपुरावा सुरु आहे
विद्यापीठाच्या ४८२ एकर जमिनीत ६५ एकर जमिनीवर वन विभागाचे आरक्षण आहे. विद्यार्थ्यांसाठी त्याठिकाणी मल्टिपर्पज हॉल बांधला जात असून त्याठिकाणी आणखी सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. त्यामुळे तेथील बांधकामे नियमित करून घेण्यासाठी विद्यापीठाचा पाठपुरावा सुरु आहे.
- डॉ. अतुल लकडे, प्रभारी कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

