राजकीय घडामोडींमुळे बारामतीत अस्वस्थता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

...कार्यकर्त्यांना धाडसच झाले नाही
सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्‌सॲप स्टेटसवर जी भूमिका मांडली, त्यानंतर बारामतीत खऱ्या अर्थाने सन्नाटा पसरला. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, याचा आनंद साजरा करण्याचे धाडसच कार्यकर्त्यांचे झाले नाही. आज पहिल्यांदाच शरद पवार की अजित पवार, अशी निवड करण्याची वेळ येते आहे की काय? अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे वातावरण सुन्न होते.

बारामती शहर - हे काय झालंय... काय नेमकं चाललंय... पुढं काय होणार... साहेबांची काय भूमिका आहे... असे अनेक प्रश्‍न आज बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपुढे होते... अजित पवार यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ भाजपच्या सरकारला पाठिंबा देत घेतल्यानंतर बारामतीत प्रचंड खळबळ उडाली. अजित पवार उपमुख्यमंत्री होतील; पण ते शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारचे, अशी सर्वांनाच खात्री होती. आज बारामतीकरांची सकाळ उगवली अजित पवार भाजपसोबत गेल्याच्या धक्कादायक बातमीनेच...

पवारांचा 'तो' फोटो स्टेट्सला ठेवून सुप्रिया सुळे म्हणतात, पुन्हा नव्याने टीम बांधू

दरम्यान, अजित पवार भाजपसोबत जातील, यावर कोणाचाच विश्‍वास बसत नव्हता. या परिस्थितीत नेमकी काय भूमिका घ्यायची, हेच कार्यकर्त्यांना समजत नव्हते.

राष्ट्रवादीच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर सर्वांनीच ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतलेली दिसली. अजित पवार यांनी बंड केलंय, राष्ट्रवादीतून बाहेर पडून त्यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे का, शरद पवार, सुप्रिया सुळे यांना याबाबतची माहिती होती की नव्हती, जर अजित पवार यांनी बंडाची भूमिका घेतली असेल तर कार्यकर्त्यांनी नेमकं काय करायचं, अशा अनेक प्रश्‍नांवर आपापसात चर्चा सुरू होत्या.

तासातासाला मुंबईत नाट्यमय घडामोडी होत असताना दुसरीकडे बारामतीतही कमालीची अस्वस्थता होती. ज्येष्ठ नेते शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नेमक्‍या काय प्रतिक्रिया द्याव्यात हेच समजत नव्हते. गेल्या अनेक वर्षांच्या राजकारणात शरद पवार हेच आपले गॉडफादर, अशी सातत्याने भूमिका घेणाऱ्या अजित पवार यांनी शरद पवारांना अंधारात ठेवून भाजपला पाठिंबा देत थेट शपथ घेतली, यावर बारामतीत कोणाचाच विश्वास बसत नव्हता. शरद पवार यांना अजित पवार यांनी अंधारात ठेवून हा निर्णय घेतल्याचे जाहीरपणाने सांगितल्यानंतर मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unrest in baramati by political movements