राज्यात लसीचा तुटवडा; अनेक जिल्ह्यात लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ

योगिराज प्रभुणे
Thursday, 8 April 2021

राज्याला मिळालेल्या एकेका लशीच्या डोसचे वितरण केले. त्यामुळे आता राज्याच्या लस साठवणूक केंद्रात लशीचा खडखडाट झाल्याचे चित्र बुधवारी दिसले.

पुणे, ता. ७ : देशात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक झालेल्या महाराष्ट्राला कोरोना प्रतिबंधक लशीचा पुरवठा करण्यास केंद्र सरकारने आखडता हात घेतला. राज्याला मिळालेल्या एकेका लशीच्या डोसचे वितरण केले. त्यामुळे आता राज्याच्या लस साठवणूक केंद्रात लशीचा खडखडाट झाल्याचे चित्र बुधवारी दिसले. देशाबरोबरच राज्यात १६ जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोठ्या गाजावाजा करून सुरू झाले. त्यासाठी १२ जानेवारीला सर्वप्रथम सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकने उत्पादित केलेली कोव्हॅक्सिन लशीचा पुरवठा केंद्राकडून करण्यात आला.

राज्याला पहिल्या टप्प्यात ९ लाख ९३ हजार डोसचा पुरवठा झाला होता. तेव्हापासून सढळ हाताने राज्याला लस दिली नसल्याचे सार्वजनिक आरोग्य क्षेत्राने दिलेल्या लशीच्या आकडेवारीवरून दिसून येते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक कोरनाबाधीतांचा आकडा महाराष्ट्रात होता. त्यातही पुणे जिल्हा हॉटस्पॉट ठरला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे सर्वाधिक कोरोना प्रतिबंधक लशीच्या वितरणात महाराष्ट्राला नैसर्गिकपणे प्राधान्य मिळाणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र राज्याला आतापर्यंत एक कोटी सहा लाख लशींचे डोस मिळाले आहेत. हे सर्व डोस राज्यातील प्रत्येक लसीकरण केंद्रापर्यंत वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता राज्याकडे लशीचा साठा शिल्लक नाही. नवीन लशीचा पुरवठा होईपर्यंत वितरित करण्यासाठी लस नसल्याची माहिती आरोग्य खात्यातून मिळाली.

राज्य लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील म्हणाले, “राज्यात १२ जानेवारीपासून एक कोटी ६ लाख २३ हजार ५०० कोरोना प्रतिबंधक लशीच्या डोसचा पुरवठा केंद्राने केला आहे. पुण्यातून राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तेथून लसीकरण केंद्रांना ही लस वितरित करण्यात आली. जेवढा लशीचा साठा केंद्राने दिला तो सर्व जिल्ह्यांना वितरित केला. त्यामुळे आता राज्यात लशीचा साठा नाही. नव्याने लशीचा पुरवठा कधी होणार, याची निश्चित माहितीही नाही.”

महाराष्ट्रातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

राज्यात लसीकरणाचा वेग वाढविला आहे. नागरिकही लसीकरणाला प्रतिसाद देत आहेत. त्यासाठी केंद्रांची संख्या वाढविली. आता त्या प्रमाणात लशीचा पुरवठा झाला पाहिजे. काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस पुरेल इतक्याच लशींचा साठा आहे. त्यामुळे पुढील ७२ तासांनंतर राज्यात लसीकरणाचा वेग मंदावले, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

अनेक जिल्ह्यात लशींचा खडखडाट
सातारा, सांगली, कोल्हापूर, गोंदियामध्ये लशींचा साठा संपला असून मुंबई, पुणे, नागपूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये दोन दिवस पुरेल इतकाच साठा उरला आहे. जर लस पुरवठा झाला नाही तर लसीकरण मोहिम थांबेल. काही जिल्ह्यांमध्ये लसीअभावी लसीकरण केंद्र बंदही करण्यात आली आहेत. 

हे वाचा - पुण्यात मिनी लॉकडाऊन तरीही कोरोनाचा कहर; रुग्णवाढीचा आकडा चिंताजनक

पुण्यात दोन दिवस पुरेल, एवढाच लशींचा साठा
एकीकडे लस घेण्याचे लोकांना आवाहन, त्यासाठीच्या सुविधांची घोषणा, दोनशेच्यावर लसीकरण केंद्र, त्यावरचे पुरेसे मनुष्यबळ असल्याचे महापालिका दाखवत आहे. पण प्रत्यक्षात लोकांना लशीसाठी चकराच माराव्या लागत आहेत. सध्या ‘डोस’ नाहीत, ते उद्या मिळतील,’ असे सांगून लोकांना घरी पाठवले जात असल्याच्या तक्रारी आहेत.

दरम्यान, रोज २० हजार लोकांना लस दिली जात असतानाच महापालिकेकडे जेमतेम ४२ हजार लशीचे डोस शिल्लक राहिले आहेत. ते पुढच्या दोन दिवसांत संपण्याची शक्यता असून, नव्याने दोन लाख डोस उपलब्ध होतील, असे महापालिका सांगत आहे. मात्र, पुरेसे डोस नसल्याने पुणेकरांची अडचण होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

गेल्या काही दिवसांत लसीकरणाच्या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून लोकांना खासगी रुग्णालये आणि महापालिकेच्या केंद्रांत लस मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. नावनोंदणीची प्रक्रिया करूनही लोकांना लस टोचून घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. मुळात खासगी रुग्णालये आणि अन्य केंद्रांवर लशीचे डोस उपलब्ध नसल्याने केंद्र व्यवस्थापनापुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vaccine shortage in maharashtra some district vaccination centres