Vasant More | नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम! वसंत मोरे औरंगाबादकडे रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vasant More Raj Thackeray
नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम! वसंत मोरे औरंगाबादकडे रवाना

नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम! वसंत मोरे औरंगाबादकडे रवाना

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आता अगदी काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता घडामोडींना वेग आला आहे. राज्याच्या विविध भागांमधून मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते औरंगाबादकडे सभेसाठी रवाना होत आहेत. पुण्यातले मनसे नेते वसंत मोरेही औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे आता नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

औरंगाबाद सभेपूर्वी दोन दिवस राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंचे जवळचे कार्यकर्ते वसंत मोरे कुठेच दिसले नव्हते. त्यामुळे वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा रंगत होती. भोंग्यांबद्दलची भूमिका राज यांनी मांडल्यानंतर वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर तातडीने मोरे यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नाराज असल्याने वसंत मोरे राज ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान आले नाहीत अशा चर्चा रंगत होत्या.

त्याच दिवशी वसंत मोरे यांनी आपल्या एका सहकाऱ्याच्या घऱी इफ्तार पार्टी करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे या चर्चांना आणखीनच हवा मिळाली. वसंत मोरे आजारी असल्याने राज ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान दिसले नाहीत, असंही काही जणांचं म्हणणं होतं. मात्र त्यानंतर आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे. वसंत मोरे यांनी व्हिडीओ शेअर करत आपण ठणठणीत असून औरंगाबादला जात आहोत, असं स्पष्ट सांगितलं आणि आता वसंत मोरे कार्यकर्त्यांसह सभेसाठी औरंगाबादकडे रवाना झाले आहेत.