

solapur city police
sakal
सोलापूर : विजापूरमधील विवाह आटोपून बिदरकडे जाताना वडकबाळ पुलाजवळ तिघांनी डोळ्यांत चटणी टाकून कार अडवून दोघांना लुटले होते. या गुन्ह्यातील तिघांना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. पोलिसांच्या रेकॉर्डवरील शिवाजी ऊर्फ मरक्या मोहन जाधव याने त्याचा भाऊ आणि मित्राच्या मदतीने ही जबरी चोरी केल्याची बाब तपासात समोर आली आहे. यात टमटमसह एकूण चार लाख ३५ हजार ६०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
बिदर (कर्नाटक) येथील मल्लिकार्जुन विश्वनाथ कोणी व त्यांचा मित्र शांतकुमार रेवणप्पा येडवे हे २ जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास विजापूरवरून बिदरकडे निघाले होते. कारमध्ये इंधन भरायचे असल्याने त्यांनी विजापूर रोडवरील वडकबाळ पुलावरून खाली उतरले. त्यावेळी रिक्षात थांबलेल्या तिघांनी मल्लिकार्जुन कोणी यांची कार अडवून त्यांच्या गळ्याला चाकू लावला. डोळ्यांत चटणी टाकून त्यांच्या हातातील अंगठ्या हिसकावून घेतल्या आणि कारची चावी घेऊन पसार झाले होते. विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पथक व शहर गुन्हे शाखेचे पथक चोरट्यांचा शोध घेत होते. गुन्हे शाखेचे नूतन सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव यांच्या नेतृत्वातील पथकाने तिन्ही चोरट्यांना जेरबंद केले.
विजापूर रोडवरील प्रतापनगर तांड्यावरील शिवाजी ऊर्फ मरक्या जाधव (वय ३४), महादेव ऊर्फ मंड्या मोहन जाधव (वय २५) व अमित ऊर्फ इंडिया हरीशचंद्र पवार (वय ३३) अशी त्या संशयित चोरट्यांची नावे आहेत. यातील शिवाजी जाधव याच्याविरुद्ध २०१२ मध्ये मंद्रूप पोलिस ठाण्यात आणि २०१४ मध्ये विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. १२ वर्षांनी त्याने पुन्हा एकदा चोरीचा गुन्हा केला. ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, प्रीतम यावलकर, सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार, गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक चंदनशिव यांच्या पथकाने पार पाडली.
‘एपीआय’ चंदनशिव यांची पहिली कामगिरी
एमआयडीसी पोलिस ठाण्यातून शहर गुन्हे शाखेत बदली झालेल्या सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव यांची ही पहिली कामगिरी ठरली आहे. गुन्हा घडल्यानंतर पाचव्या दिवशी त्यांच्या नेतृत्वातील पथकाने जबरी चोरीचा छडा लावला. त्यासाठी परिसरातील १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली. चार ते पाच हजार मोबाईल क्रमांकांचा टॉवर डम्प डेटा तपासला आणि चोरट्यांना शोधून काढले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.